पाल घाटातील लावलेल्या संरक्षक कठडयाने वाचविले अनेकांचे प्राण
फैजपूर :- शहरातील व्यवसायानिमित्त पाल, ता.रावेर येथील आठवडे बाजारासाठी जाणाऱ्या फैजपूर येथील व्यवसायीकांच्या मिनी ट्रकला पालच्या घाटात अपघात झाल्याने त्यात फैजपूर येथील दोन जण ठार झाले तर 10 ते 12 जण जखमी झाले. सुदैवाने पलटी झालेला ट्रक घाटातील संरक्षक जाळीला अडकल्याने मोठा अनर्थ टळला. या अपघातात मोतीलाल पंडित गुरव (वय 52) व शेख अरबाज शेख सादिक (वय 20) मतात झाले. या अपघात प्रकरणी वाहन चालक शेख मुजाहिज शेख कलीम याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
आठवडे बाजारासाठी जातांना अपघात
फैजपूर येथील ब्राम्हण गल्लीतील पोलीस स्टेशनजवळ असणाऱ्या मोतीलाल पंडित गुरव यांच्यासह शहरातील काही छोटे मोठे व्यावसायिक दर मंगळवारी पाल बाजारास जात असतात त्या प्रमाणे आज मंगळवारी सकाळी (एम. एच.15 जी 7370) या मिनी मालवाहू ट्रकने सर्व व्यावसायिक पाल येथे आठवडे बाजारासाठी जात असतांना पाल घाटातील उतरतीवर ट्रक चे ब्रेक फेल झाल्यामुळे चालकाचे ट्रक वरील नियंत्रण सुटल्याने ट्रक पलटी झाला. या अपघातात फैजपूरातील दोघांना आपला जीव गमवावा लागला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस तसेच रस्त्याने ये जा करणाऱ्या प्रवाशांनी तातडीने फैजपूर येथील डॉ.खाचणे यांच्या खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले तर काही जखमींवर खिरोदा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. अपघातप्रकरणी सावदा पोलिसात ट्रक चालक शेख मुजाहिज शेख कलीम याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास एपीआय राहुल वाघ व सहकारी करीत आहे.
मयत व जखमी असे
या अपघातातील मोतीलाल पंडित गुरव हे घटनास्थळीच मानेला पत्रा लागल्याने जागीच ठार झाले तर शेख अरबाज शेख सादिक याला रुग्णालयात आणल्यावर डॉक्टरांनी मृत घोषित केले. अपघातात शकील इस्माईल तडवी, फिरोज इस्माईल तडवी, दानिश खान अस्लम खान, आसिफा खान अस्लम खान, एजाज खान अशरफ खान, मोहम्मद साद अस्लम खान, कैलास प्रदीप सोनार, विजय सुपडू जैन व सुपडु जैन हे जखमी झाले.