पाल परिसरात चिमणी संवर्धनासाठी करण्यात आले घरट्यांचे वाटप

0

खिर्डी। महाराष्ट्र शासन वनविभाग व इला फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने चालू असलेल्या चिमणी संवर्धन अभियानात चातक निसर्ग संवर्धन संस्थेने सहभाग घेतला असून पृष्ठापासुन बनविलेल्या घरट्यांचे वाटप यावेळी करण्यात आली व यांची नोंद संगणकीकृत करण्यात आली. ग्रामीण भागात असलेल्या चिमण्यांचे संवर्धन व्हावे त्यांचा र्‍हास होण्याच्या मार्गावर असुन त्यांचे संवर्धन होणे गरजेचे आहे. असे मत इला फाउंडेशन पुणेचे डायरेक्टर डॉ. सतिष पांडे यांनी मांडले.

इला फाउंडेशनचे डॉ. पांडे यांनी केले मार्गदर्शन
सातपुडाच्या कुशित असलेल्या पाल येथील दादासाहेब चौधरी वन प्रशिक्षण केंद्रामधे वनरक्षक विद्यार्थ्यांना 12 व 13 रोजी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी इला फाउंडेशनचे डॉ. सतीष पांडे यांनी सांस्कृतिक पक्षीशास्त्रात चिमणीचे स्थान या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. चातक निसर्ग संवर्धन संस्थेचे अध्यक्ष अनिल महाजन यांनी बनविलेल्या पक्षीवर आधारित तांबटाची विण हे लघुचित्रफीत दाखवण्यात आली व त्यांनी विश्लेषणात्मक करुन सांगितले.

पक्षी संवर्धनाचे सांगितले महत्व
कार्यशाळेच्या दुसर्‍या सत्रात पक्षीप्रेमी शिवजी जवरे यांनी पक्षी संवर्धन यावर मनोगत व्यक्त केले तर पक्षीप्रेमी लक्ष्मीकांत नेवे यांनी इ-बर्ड्स याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व पक्ष्याविषयी आवड कशी निर्माण होईल यावर भर देत पक्षीमित्र उदय चौधरी यांनी आपल्या संस्थेच्या कार्याची विविध उपक्रमाची माहिती दिली.

दुर्बिणीद्वारे केली नोंद
पाल परिसरात या अभियानांतर्गत 13 रोजी सकाळी 5 ते 9.30 पर्यंत पक्षी गणना करण्यात आली. यात विविध प्रकारच्या पक्षांचे दुर्बिणच्या सहाय्याने निदर्शनास आलेल्या चिमण्यांची नोंद करण्यात आली. यावेळी पक्षी अभ्यासक अनिल महाजन, उदय चौधरी, शिवाजी जवरे, मनोज बड़गुजर, लक्ष्मीकांत नेवे, बाबा जावळे, विलास महाजन, संकेत पाटील या सर्व चातक सदस्यांनी कार्यशाळेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले. शेवटच्या सत्रात विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यात महाराष्ट्र राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील विद्यार्थी विद्यार्थ्यांचा समावेश होता दादासाहेब चौधरी वनप्रशिक्षण पाल संस्थेचे भवर, कुलकर्णी, एल.पी. राणे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते तर आभार कुलकर्णी यांनी मानले.