फायनान्स कंपनीच्या कर्मचार्यांना दुचाकीची धडक देत लांबवली रक्कम
रावेर- पाल येथून बचत गटाची वसुली घेऊन रावेरकडे येणार्या दोन फायनान्स कंपनीच्या खाजगी कर्मचार्यांना रावेर-पाल रस्त्यावर लालमातीनजीक दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी धमकावत त्यांच्याकडील एक लाख 92 हजारांची रक्कम जबरीने हिसकावून पळवल्याची घटना बुधवारी दुपारी 12 वाजता घडली. या घटनेने खळबळ उडाली असून कर्मचार्यांनी सांगितलेल्या वर्णनावरून चोरट्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे.
रावेर पोलिसात चोरट्यांविरुद्ध गुन्हा
ग्रामीण कुटा फायनान्स कंपनी सर्विसेस या कंपनीने पाल येथे बचत गटाला कर्ज दिले होते. त्याच्या वसुलीसाठी अनिल बोरसे आणि रोहित आखाडे हे कर्मचारी बुधवारी सकाळी पाल येथे गेले होते. त्यांनी 12 बचत गटांकडून एक लाख 96 हजार रुपये वसूल केले. ही रक्कम घेऊन दोघे दुचाकीने रावेरच्या दिशेने येत असताना कुसुंबा-लालमाती दरम्यान आभोडा फाट्यानजीक एकाच दुचाकीवर बसून आलेल्या चार चोरट्यांनी त्यांच्या वाहनाला धडक दिल्याने कंपनीचे दोन्ही कर्मचारी खड्ड्यात पडले. याचवेळी चोरट्यांनी त्यांना धमकावून त्यांच्या जवळील पैशांची बॅग व मोबाईल घेऊन पालच्या दिशेने पलायन केले. या घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी राजेंद्र रायसिंग, पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी पाळढे, पोलिस उपनिरीक्षक अमृत पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान, अनिल जयराम बोरसे यांच्या फिर्यादीवरुन रावेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.