पाल वनपरीक्षेत्रात शेंड्याअंजनचा शिकारी जाळ्यात

0

अन्य शिकारी पसार ; ठासणीच्या बंदुकीसह शिकारीचे साहित्य जप्त

रावेर- रावेर-पाल वनपरीक्षेत्रात शिकारीच्या उद्देशाने आलेल्या हत्यारबंद शिकारी समूहापैकी एका शिकारीस पाठलाग करुन वनविभागाने अटक केली तर अन्य शिकारी पसार झाले. नियतक्षेत्र पाल कं.नं. 59 मध्ये शिकारीच्या उद्देशाने शिकारीसमूह येत असल्याची गुप्त माहिती पाल-रावेर वनपरीक्षेत्र वनविभागास मिळाली. वनक्षेत्रपाल राजेंद्र राणे यांनी वनविभागाचे पथक तयार करून शिकार्‍यांसाठी सापळा रचला. पथकातील कर्मचारी वैशाली कुंवर, प्रकाश सलगर, वनपाल एस.के.सोनवणेंसह अन्य वनरक्षकांनी सापळा रचून पाठलाग करत धनसिंग कुटवाल बारेला (वय 51, शेंड्या अंजन) या संशयित आरोपीस अटक केली. अन्य संशयीत शिकारी पळून जाण्यात यशस्वी झाले. संशयित आरोपी जवळून ठासणीची बंदूक, कुर्‍हाड व गोफण आदी हत्यारे वनविभागाने हस्तगत केली आहेत. आरोपीस रावेर न्यायालयांत हजर केले असता त्यास 10 मे पर्यंत वनकोठडी सुनावण्यात आली. रावेर वनपरीक्षेत्र अधिकारी राजेंद्र राणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभाग अधिकारी तपास करीत आहेत.