पाळणाघरात ठेवलेल्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर दोन तरुणांनाकडून लैंगिक अत्याचार

0

पुणे:कोथरूड परिसरातील पाळणाघरात ठेवलेल्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर दोन तरुणांनी लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी दोन मुलांसह पाळणाघरचालक महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन मुलांना ताब्यात घेतले आहे.

पीडित मुलीच्या आईने या प्रकरणी तक्रार दिली आहे. त्यानुसार कोथरूड पोलिसांनी तिघांच्या विरोधात बलात्कार, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्ररादार या नोकरी करतात. त्यामुळे त्या त्यांच्या तीन वर्षाच्या मुलीला कोथरूडमधील एका घरगुती पाळणा घरात ठेवत होत्या. पाळणाघरचालक महिलेचा १७ वर्षांचा मुलगा आणि त्याचा १८ वर्षांचा मित्र हे पीडित मुलीवर अत्याचार करत होते.  पीडित मुलगी घरी गेल्यानंतर कपडे काढून झोपत होती. पालकांना हा विचित्र प्रकार वाटला. त्यामुळे त्यांनी त्या मुलीकडे चौकशी केली. त्या वेळी तिने पाळणाघर येथील दादानेच असे कारायचे असल्याचे सांगितले. त्यांनंतर अधिक चौकशी केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला.

मुलीच्या पालकांनी तत्काळ कोथरूड पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार कोथरूड पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी असलेल्या अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले आहे. तर, त्याच्या मित्राला अटक केली आहे. त्याला शुक्रवारी कोर्टात हजर करण्यात आले. विशेष न्यायाधीश आर. व्ही. अदोणे यांनी त्याला ४ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.