जळगाव । कर्जमाफीसाठी शेतकरी राज्यात ठिकठिकाणी आंदोलन करत असतांना या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री यांनी घाईघाईने कर्जमाफीचा निर्णय घेवून टाकला. कर्जमाफीची घोषणा होवून आज महिना होवून गेला तरी शेतकर्यांच्या खात्यात अद्याप कोणतेही रक्कम पडली नाही. जोपर्यंत लाभ मिळत नाही व शेतकर्यांचा सातबारा कोरा होत नाही, तोपर्यंत आपला लढा सुरुच राहणार असल्याचे शिवसेनेचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी आज पाळधी (जळगाव) येथे शेतकर्यांशी संवाद साधतांना सांगितले. सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे जन्मगाव असल्यामुळे त्यांनी पाळधी येथे पाच मिनिटे थांबून ना. पाटील यांनी केलेल्या कामांचे कौतूक करून ‘एक कट्टर शिवसैनिक आणि एक तोफ म्हणून त्यांची महाराष्ट्रात ओळख आहे, ज्या ज्या ठिकाणी मला गरज लागते त्या त्या ठिकाणी मी गुलाबरावांना पाठवितो’ असे सांगून चांगला शिवसैनिक दिला यासाठी पाळधीकरांचे धन्यवाद मानले.
ढोल बजाव आंदोलन सरकारचे लक्ष वेधण्यासाठीच- ठाकरे
सध्या महाराष्ट्रातली परीस्थिती काय आहे? ही सांगायची गरज नाही. कर्जमुक्तची घोषणा करून फक्त आरामात बसणे हे शिवसेनेला मान्य नाही. ही कर्जमुक्ती झाली की नाही हे आपल्याला प्रत्यक्ष पाहणे गरजेचे आहे. म्हणून 10 जुलै रोजी जे ’ढोल बजाव’ आंदोलन केले ते सरकारला जाग आणण्यासाठी केले असून त्यांना सांगायचे आहे. प्रत्यक्ष घोषणा खूप झाल्या पाऊस येणार म्हणून आत्तापर्यंत अनेक तारखांमध्ये बदल झालेत पाऊस आला नाही त्याच पद्धतीने कर्जमाफी होणार अशी घोषणांबाबत होवून नये तसेच आपला शेतकरी कर्जमुक्त होतो की नाही हेही पाहणे गरजेचे आहे. जोपर्यंत शेतकर्यांची कर्जमुक्ती होत नाही तोपर्यंत आम्ही पाठपुरावा करणार असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी दौर्यात शेतकर्यांशी संवाद साधतांना पाळधी येथे बोलत होते.
सुरेशदादा जैन यांची घेतली भेट
ठाकरे हे बुधवार 12 जुलै रोजी खान्देशच्या दौर्यावर असतांना सर्वप्रथम पाळधी येथे त्यांनी शेतकर्यांशी संवाद साधला. जळगाव विमानतळावर उध्दव ठाकरे यांचे स्वागत माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी केले. सोबत परीवहन मत्री दिवाकर रावते, सहकार राज्य मंत्री ना. गुलाबराव पाटील, रामदास कदम होते. सकाळी 11.45 वाजात जळगाव विमानतळावर आगमन झाले. त्यानंतर माजी मंत्री सुरेशदादा जैन यांची भेट घेवून पाळधीकडे रवाना झाले. पाळधी येथील आठवडे बाजारातील गांधी चौकात भेट दिली. त्यांनतर ते धरणगाव येथील शेतकरी संवाद सभेला रवाना झाले.