पाळधीनजीक खदानीत प्रेमीयुगलाचा मृतदेह आढळला

0

मुलाच्या नातेवाईकांकडून घातपाताचा आरोप ; तरुण नशिराबादचा तर अल्पवयीन मुलगी पाळधी येथील रहिवासी

जळगाव- धरणगाव तालुक्यातील पाळधी गावाजवळील 20 फूट खोली पाणी असलेल्या खदानीत प्रेमी युगल तरुण- 15 वर्षीय मुलगी असे दोघांचे मृतदेह आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास समोर आला आहे. जयेश दत्तात्रय पाटील वय 19 हा रा. नशिराबाद या तरुणाचे नाव आहे. दोघेही 2 ऑक्टोंबरपासून आप-आपल्या घरुन बेपत्ता असल्याची माहिती मिळाली आहे. दोघांचे मृतदेहासोबत तरुणाची दुचाकीही खदानीच्या पाण्यात पडलेली आढळून आल्याने मुलीच्या कुटुंबियांनी हा अपघात झाल्याचे म्हणणे आहे तर तरुणाकडील नातेवाईकांनी अपघात आत्महत्या नसून घातपाता आरोप केला आहे. या घटनेबाबत ऑनर किलींगची जोरदार चर्चा होती.

दोघेही आपआपल्या घरुन होते दोन दिवसांपासून बेपत्ता

1 जयेश पाटील हा नूतन मराठा विद्यालयात प्रथम वर्ष कला या शाखेत शिक्षण घेतो. आई , वडील व लहान भाऊ असा त्याचा परिवार आहे. हातमजुरी करुन कुटुंबांचा उदरनिर्वाह भागवितात. 2 ऑक्टोबर रोजी घरात कुणालाही काही एक न सांगता जयेश हा गावातील त्याच्या मित्राची दुचाकी (एम.एच.19 डी.एच 6816) घेवून पाळधी येथील मुलगी प्रिया दत्तात्रय पाटील हिला भेटायला गेला. दोन दिवसांपासून जयेशला त्याचे कुटुंबिय शोध होते.

2 पाळधी येथील 15 वर्षीय मुलगी आई, वडील, लहान भाऊ असा तिचा परिवार आहे. वडील एका खाजगी कंपनीत नोकरी करुन उदरनिर्वाह भागवितात. गावातील भवानी मंदिर येथे असलेल्या खाजगी क्लासला जावून येते असून सांगून ती 2 ऑक्टोबर रोजी घराबाहेर पडली. यानंतर पुन्हा घरी परतली नाही. तिच्या कुटुंबियांसह नातेवाईकांकडून तिचा शोध घेतला जात होता मात्र ती मिळून न आल्याने गुरुवारी रात्री कुटुंबियांनी पाळधी पोलिसात तक्रार दिली होती. अल्पवयीन असल्याने पाळधी पोलीसात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे.

दुचाकीसह खदानाती तरुणासह मुलीचा मृतदेह
शुक्रवारी सकाळी पाळधी गावापासून एक ते दीड किलोमीटर अंतरावर वीटभट्ट्या आहेत. या वीटभट्ट्याजवळून शौचालयात जात असलेल्या एका वीटभट्टी कामगाराला याठिकाणी 20 खोल पाणी असलेल्या खदानीत मुलगा, मुलगी तसेच पाण्यात दुचाकी पडलेली असल्याचे आढळून आले. या नागरिकाने तत्काळ पाळधी पोलिसांना माहिती दिली. पाळधी पोलीस ठाण्याच्या कर्मचार्‍यांनी घटनास्थळ गाठले. मुलीचा शोध घेत असलेल्या तिच्या कुटुंबियांसह नातेवाईकांनी या प्रकाराची माहिती मिळाली. त्यांनीही घटनास्थळ गाठले. मुलीमुळे मुलाचीही ओळख पटली. त्याच्या नशिराबाद येथील कुटुंबियांना तसेच नातेवाईकांना फोन करुन प्रकार कळविण्यात आला. त्यांनीही घटनास्थळ गाठले. दोघा नातेवाईकांच्या उपस्थितीत पाण्यातून मृतदेह तसेच दुचाकी खदानीत बाहेर काढण्यात आली. दोघांचे मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.

तरुणाच्या नातेवाईकांकडून इन कॅमेरा शवविच्छेदनाची मागणी
जयेशला याला पोहायला येत होते. तो धरणात पोहायचा. त्यामुळे तो 20 फुट पाण्यात बुडून मरु शकत नाही. मृतदेह बघितला असता त्याच्या मानेजवळ काही जखमा आहे. जयेशसह सोबतच्या मुलीला मारुन त्यांच्यासोबत दुचाकीही पाण्यात फेकून देण्यात आली असून दोघांची आत्महत्या, अपघात नव्हे तर घातपात झाल्याचा आरोप तरुणाच्या नातेवाईकांनी करत इन कॅमेरा शवविच्छेदन करण्याची मागणी केली. यासाठी कुटुंबियांसह नातेवाईकांनी अधिष्ठांतांची भेट घेतली. त्यांनी धुळे येथे इन कॅमेरा शवविच्छेदन करणारे डॉ. देवराज हेच शवविच्छेदन करणार असल्याची माहिती दिली.

मुलीच्या नातेवाईकांकडून अपघात झाल्याचा अंदाज
जयेश व 15 वर्षीय मुलगी हे दोघेही एकाच समाजाचे आहेत. जयेश मुलीला भेटण्यासाठी आला असावा. दोघेही खदानीजवळ जात असताना त्यांना कुणीतरी बघितले असावे, पळण्याच्या नादात त्यांचा दुचाकी खदानीत पडून अपघात झाला असावा, यात बुडून दोघांचा मृत्यू झाल्याची शक्यता मुलीकडील नातेवाईकांनी व्यक्त केली आहे.

शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच नेमके कारण समोर येणार
दोघांचे मृतदेह फुगून वर पाण्यावर तरंगत होते. त्यामुळे 2 ऑक्टोबर पासून जयेश व मुलगी दोघेही बेपत्ता असल्याने त्याच दिवसांपासून दोघेही खदानीत असावे असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पाळधी पोलिसात मुलीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल आहे. याचा तपास सहाय्यक फौजदार निलिमा हिवराळे करीत असून त्याच्यासह हेड कॉन्स्टेबल अरुण निकुंभ, पोलीस कॉन्स्टेबल सुमीत पाटील, पोलीस नाईक गजाजन महाजन आदींनी जिल्हा रुग्णालयात गाठले. व घटनेचा पंचनामा केला. शवविच्छेदनात दोघांचाही बुडून मृत्यू झाल्याचे समोर आले असून दोघांचाही व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. त्या च्या तपासणीत मृत्यूचे नेमके कारण समोर येईल असे सहाय्यक फौजदार हिवराळे यांनी बोलतांना सांगितले.