पाळधी येथे गर्भवती महिलेचा शॉक लागून मृत्यू

0

जळगाव। धरणगांव तालुक्यातील पाळधी येथील गर्भवती महिलेचा इलेक्ट्रीक शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी 8.30 वाजेच्या पुर्वी घडली.

दरम्यान, सकाळी जिल्हा सामान्य रूग्णालयात महिलेच्या मृतदेहावर शवविच्छेदन करण्यात आले आहे. तर याप्रकरणी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात शुन्य क्रमांकाने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पाळधी येथील रहिवासी राधिका प्रविण पाटील (वय-27) या गर्भवती महिलेस बुधवारी सकाळी 8.30 वाजेच्यापुर्वी अचानक इलेक्ट्रीक शॉक लागला. यात त्या गंभीर जखमी झाल्याने त्यांना सकाळी कुटूंबियांनी तातडीने जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. विसपुते यांनी महिलेची प्राथमिक तपासणी नंतर त्यांना मृत घोषित केले. महिलेचा मृत्यू झाल्याचे कळताच नातेवाईकांनी रूग्णालयात एकच आक्रोश केला. यानंतर शवविच्छेदन करण्यात येवून महिलेचा मृतदेह कुटूंबियांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी डॉ. विसुपते यांच्या खबरीवरून जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पूढील तपास पुरूषोत्तम वाघळे करीत आहेत.