पाळीतलं पुरुषत्व…!

0

पिरेड अर्थात मासिक पाळी आली की आई, चुलत्या आणि घरातल्या, गल्लीतल्या बायका लांब बसायच्या. आम्ही लहान पोरं त्यांच्याकडे गेलो की, ’अय तिकडं लांब खेळा, शिवू नका’, अशा सूचनावजा धमक्या मिळायच्या. चुकून कधी शिवलचं तर घरात बापाकडून किंवा अन्य पुरुषांकडून मार बसायचा. मग आईला विचारायचो ’आय, का गं, शिवायचं नाही’ तर आई कावळ्याने शिवलंय, देवाने सांगितलंय, अशी कारणं सांगून दूर राहायला सांगायची. एखाद्यावेळी शिवलं तर गाईच्या पाया पडायला लावायची. लहान लेकराला माफ असतंय म्हणून कुशीत घेऊन झोपायची. तिला 4 दिवस पाणी, जेवण आणि सगळंच लांबून मिळायचं. भांडी घासणे, कपडे धुणे अशी कामे मात्र तिने केली तरी चालायची. म्हणजे त्या चार दिवसांत तिच्याकडे हे अधिकच काम वाढायचं. तिची या चार दिवसांतली कपडे वेगळी असायची, जी तिला पाचव्या दिवशी धुऊन टाकावी लागायची. आई, घरात कुणी नसताना पाय चेपून दे म्हणायची, तर आम्ही खेळायला पळून जायचो. मात्र, या अजाणत्या वयात अशिक्षितपणामुळे एकही जाणता पुरुष अथवा स्त्री भेटली नाही की, जो ’चार दिवसांचं’ महत्त्व आणि त्रास समजावून सांगेल.

बरंच मोठं होईपर्यंत ही चार दिवसांची भानगड कळाली नाही. मग कॉलेजवयात काही मैत्रिणी आणि प्रेमात पडल्यावर प्रेयसी अर्थात बायकोकडून ही भानगड नेमकी काय असते ते समजलं. शिक्षित आणि खुल्या विचारांच्या काही मैत्रिणी यावर भरभरून बोलायच्या तेव्हा ’पिरेड’ समजू लागला. मात्र, त्यांच्या बोलल्याने त्याची तीव्रता कळाली नाही. प्रेमात पडल्यावर म्हणजे बायकोशी मुक्तपणे बोलायला लागल्यावर या दिवसांची तीव्रता आणि त्रास समजायला लागला. तिला त्रास व्हायला लागल्यावर ती ढसाढसा रडायची, तेव्हा दूर असल्याने मी काहीच करू शकत नसायचो, त्यावेळी पुरुष असण्याची लाज वाटायची.

आज, मात्र या गोष्टीला आम्ही आनंदाने जगतो. मी स्वतः तिला दुकानातून काळ्या पिशवीत न घालता सॅनिटरी नॅपकिन आणून देतो. खरंतर चार दिवस हे नावाला असतात. मात्र, पाळी येण्याच्या आधी दोन दिवस, पाळीचे चार दिवस त्रास आणि त्यानंतरचे दोन-तीन दिवस अशक्तपणा या गोष्टीचा सामना महिलांना करावा लागतो. या चार दिवसांत पहिल्या दोन दिवस त्यांना फार त्रास होतो. यावेळी त्यांना जवळिकीची आणि प्रेमाची गरज असते. प्रेमाने बोलणारे, मायेचे शब्द हवे असतात. यावेळी हातपायाचा गळाटा झाल्याने हातपाय चेपून देण्याची गरज असते.

आपण शिक्षित आहोत म्हणून या अपेक्षा आपण नक्की पूर्ण करू शकतो. अभिमानाने सांगत नाही. मात्र, मी या चार दिवसांत घरातलं जास्तीत जास्त काम करतो आणि तिचा ताण कमी करतो. (तसं मी रोजच लागेल ती मदत तिला घरकामात करतो) हा काळ फार नाजूक असतो. या नाजूक काळात बायकांचे मूड सेन्स बदलतात. यामुळे चिडचिड, राग, रडणे या गोष्टी अचानक होतात. यामुळे आपण न चिडता त्यांच्या भावना समजून घेऊन प्रेमाने वागणे महत्त्वाचे असते. तिच्यासाठी कॅडबरी, आईस्क्रीम अशा छोट्या-छोट्या गोष्टी आणतो. तिला चहा करून देतो. अंग चेपून देतो. दोघेच असल्याने तिला आवडणारे खिचडी, ऑम्लेट, अंडामॅगी अशा गोष्टी ऑफिसवरून आल्यावर करून देतो. अर्थात हे तिच्या त्रासापेक्षा फार मामुली आहेत. कसय या गोष्टींनी विशेष काही फरक नाही पडत. मात्र, त्यांचा त्रास कमी होतो आणि आपल्यावर दुपटीने प्रेम करतात ह्या बायका. फार हळव्या असतात हो बायका. आपल्या अनेक चुकांना या प्रेमामुळे कुणी पदरातनाही घेतलं तर त्या नक्की घेतात. नाहीतरी पुरुषत्वासारख्या भिकार गोष्टीशिवाय आपल्याकडं विशेष आहे तरी काय? त्यामुळे हे संपवू, नाही संपलं तर कमी तरी करूच.

माझी मैत्रीण प्रियंका तुपे म्हणते, ’मुलींना मासिक पाळी येते म्हणजे नेमकं काय होतं.. का येते? काय शारीरिक बदल होतात..यावर आता मुलींसोबत मुलंही वाचू लागलीयत, समजून घेऊ लागलीयत. सोशल मीडियावर लिहू लागलीयत. हे चित्र सकारात्मक बदलांचे वारे आहे. जितकं हे झाकून ठेवू, तितकं आपण आपल्या आयुष्यातल्या पुरुषांना त्यापासून अज्ञानात ठेवतोय. ज्याबद्दल मोकळा, स्वच्छ संवाद होणं गरजेचं आहे.’ खरंतर ग्रामीण भागात अजूनही या गोष्टीबद्दल फार गुप्तता पाळली जाते. याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे ग्रामीण व मागास क्षेत्रामध्ये स्वच्छतेचा अभाव मोठ्या प्रमाणावर आहे. अजूनही ग्रामीण भागात अज्ञान आणि शिक्षणाच्या अभावामुळे मुलींना मोठ्या प्रमाणावर त्रास सोसावा लागतोय. दुसरीकडे काही प्रमाणावर बदलदेखील घडतोय. खासकर शहरात या गोष्टी समजून घेणारा वर्ग वाढतोय, हे चित्र आशादायी आहे. प्रत्येकाने आपल्या घरातून जरी सुरुवात केली, तरी ही चळवळ व्यापक होऊ शकते. याला बळकटी देण्यासाठी परंपरावादी पुरुषत्व बाजूला ठेवणे आवश्यक आहे आणि स्त्रीनेही मनाची कवाडं उघडणे आवश्यक आहे. परवा मासिक पाळी दिवस झाला. खरंतर कुठल्याही गोष्टीसाठी एक दिवस साजरा करण्याच्या मताचा मी विरोधक आहे. मात्र, काही चांगल्या गोष्टींबाबत जागृती होण्यासाठी असे दिवस मोठ्या प्रमाणावर साजरे होणे आवश्यक आहे. मात्र, हे करताना केवळ दिखाऊपणा न करता त्याला प्रत्यक्ष कृतीची जोड मिळणे अत्यावश्यक आहे.