मुंबई । वांद्र्याच्या सेंट तेरेसा स्कुलमध्ये रस्त्यावरील भटक्या पाळीव प्राण्यांची देखभाल करून ते पाळीव प्राणी दत्तक दिले जातात. मुंबईतील ’वर्ल्ड फॉर ऑल’ या सामजिक संस्थेतर्फे हा पाळीव प्राण्यांना दत्तक देण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला जात आहे. वांद्र्याच्या सेंट तेरेसा शाळेत 2 दिवसांच्या ’अडॉप्टथॉन’ या कॅम्पच्या अंतर्गत पाळीव प्राण्यांना लोकांना दत्तक दिले जाते. ही संस्था हे पाळीव प्राणी रस्त्यावरून उचलून त्यांची योग्य ती देखभाल करते. तसेच त्यांच्यावर पूर्णपणे डॉक्टरकडून उपचार करून घते. त्यानंतर त्यांना इतर विक्रीसाठी असलेल्या पाळीव प्राण्यासारखे तयार केले जाते. यात श्वानांच्या, मांजरांच्या 180 पिल्लांचा समावेश आहे.
संस्थेच्या एडॉप्शन कॅम्पला मुंबईकरकडून चांगला प्रतिसाद
या संस्थेचा 7 वा एडॉप्शन कॅम्प आहे. मात्र, यावर्षी या कॅम्पला मुंबईकरकडून चांगलाच प्रतिसाद मिळतो आहे. ज्या व्यक्तीला एखादा पाळीव प्राणी दत्तक घ्यायचा आहे, त्यांनी आपले ओळखपत्र दाखवून आपल्याला जो प्राणी हवा आहे तो निवडायचा. त्यांनंतर या संस्थेचे सदस्य त्या दत्तक घेणार्या व्यक्तीची एक छोटीसी मुलाखत घेतात. तो व्यक्ती या प्राण्यासाठी योग्य वाटला तर त्याला त्या प्राण्याच्या खरेदीची कसलीही किंमत न घेता त्याला ते सुपूर्द करतात. याशिवाय दत्तक दिल्यानंतर सुद्धा त्या प्राण्याची योग्य देखभाल दत्तक घेतलेल्या व्यक्तीकडून घेतली जाते का नाही याची सुद्धा तपासणी दर महिन्याला संस्थेकडून केली जात असल्याची माहिती संस्थेच्या पदाधिकार्यांनी दिली.