समितीच्या कार्यकाळात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या रकमेच्या कामांना मान्यता
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीची 2019 या नवीन वर्षातील पहिली सभा शुक्रवारी मोठ्या धुमधडाक्यात पार पडली. आज झालेल्या दोन सभेत सुमारे 358 कोटी रुपयांच्या विकास कामांना मान्यता देण्यात आली. या समितीच्या कार्यकाळात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या रकमेच्या कामांना मान्यता देण्यात आली असून स्थायी समितीची नवीन वर्षाची सुरुवात धडाक्यात सुरु झाल्याची चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे. दरम्यान, स्थायी समितीचा कार्यकाळ दोन महिनेच शिल्लक राहिला असून उर्वरित काळात आठ सभा होण्याचे निर्धारित आहे.
समितीचा कार्यकाळ संपणार
हे देखील वाचा
महापालिकेची 26 डिसेंबर 2018 रोजी आणि 1 जानेवारी 2019 ची अशा दोन तहकूब सभा शुक्रवारी पार पडल्या. सभापती ममता गायकवाड सभेच्या स्थानी होत्या. दोन सभेत सुमारे 358 कोटी रुपयांच्या विकास कामांना मान्यता देण्यात आली. महापालिकेच्या स्थायी समितीच्या सदस्यांचा वर्षभराचा कार्यकाळ संपण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. प्रत्येक सदस्याला स्थायी समितीत संधी देण्यासाठी भाजपने ‘ड्रॉ’मधून वाचलेल्या नगरसेवकांचे देखील गतवर्षी राजीनामे घेतले होते. त्यामुळे भाजपच्या सदस्यांना स्थायी समिती वर्षभरासाठीच मिळणार आहे. तर, राष्ट्रवादीचे दोन नगरसेवक नियमानुसार समितीच्या बाहेर पडणार आहेत. या समितीच्या कार्यकाळात आजपर्यंत एवढ्या मोठ्या रकमेचे विषय मान्यतेसाठी आले नव्हते. पहिल्यांदाच 358 कोटी रुपयांचा विषयांना मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे नवीन वर्षातील स्थायी समितीची पहिली सभा धुमधडाक्यात पार पडली. स्थायी समिती सदस्यांचा कार्यकाळ दोन महिनेच शिल्लक राहिला असून आगामी दोन महिन्यात आठ सभा होण्याचे निर्धारित आहे. फेब्रुवारी अखेर लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे उर्वरित काळात विषय मंजुर करण्याचा धडाका लावला जाण्याची शक्यता आहे.
या विकासकामांना मंजुरी
पुणे-आळंदी रस्ता विकसित करणे, भाग एक, 41 कोटी 95 लाख, पुणे-आळंदी रस्ता विकसित करणे, भाग दोन, 41 कोटी 80 लाख, प्रभाग क्रमांक सहा रस्ता विकसित करणे 25 कोटी, चर्होलीतील 12 मीटर रस्ता विकसित करणे 16 कोटी 41 लाख, पिंपळे निलख विशालनगर 24 मीटर रस्ता विकसित करणे 13 कोटी 28 लाख, आकुर्डी स्टेशन येथील 24 मीटर रस्ता विकसित करणे 11 कोटी 68 लाख, वायसीएमएच येथील नवजात अर्भक विभागाचे नुतनीकरण 30 कोटी 66 लाख, प्रभाग क्रमांक सात 18 मीटर रस्ता विकसित करणे 19 कोटी 47 लाख, आवास योजनेअंतर्गत पिंपरीत गृहप्रकल्प 33 कोटी 64 लाख, आकुर्डी येथे गृहप्रकल्प 52 कोटी 76 लाख अशा सुमारे 358 कोटी रुपयांच्या विकासकामांना मान्यता देण्यात आली आहे.