पावणे दोन लाखांच्या गावठी दारूसह साहित्य जप्त

0

नवापूर । नवापूर तालुक्यातील बीजगांव शिवारात सुमारे पावणे दोन लाखांच्या गावठी दारूसह साहित्य जप्त केले आहे. यामुळे तालुक्यातील गावठी दारू हातभट्टी विक्रेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक व विसरवाडी पोलीस यांनी संयुक्त कारवाई केली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, काल भल्या पहाटे स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली. खांडबारा हद्दीतील बिजगाव शिवारात गावठी दारूची सर्रास विक्री होत आहे असे समजले. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक व विसरवाडी पोलीसांना मिळालेल्या माहितीच्या आधारावर घटनास्थळी धाव टाकली.

धाड टाकताच गावठी दारू विक्री करणारे व पिणारे सैरावैरा पळत सुटले होते. या धाडीत गावठी दारूसाठी लागणारे रसायन, 5 हजार 400 लिटर गावठी दारू व 27 ड्रम असा 1 लाख 70 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची कारवाई स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक गिरीश पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक धनंजय पाटील, विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक गुलाब मोरे, अभय मोरे, हे. कॉ. बागुल, मोजु गावीत, पी एन गावीत, संजय साळवे, पो कॉ पावरा, दारासिंग पाडवी आदींचा पथकाने केली. नवापूर तालुका या आदिवासी बहुल भागात हातभट्टी दारू विक्री व दारू पिण्याचे प्रमाण खूपच वाढले आहे, कमी वयातच मुल दारूच्या आहारी जाऊन व्यसनाधीन झाले आहेत. तरूण अवस्थेत दारूमुळे कर्ज बाजारी होऊन आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. या हातभट्टीची खराब दारू पिऊन अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. आदिवासी भागात व्यसनमुक्तीसारखे उपक्रम तसेच सामाजिक प्रबोधन करणे आवश्यक आहे. दारू पिण्यासाठी गुजरातहून अनेक शौकीन नवापूर शहर व तालुक्यात येत असतात गुजराथमधे दारू बंदी असल्याने छुप्या पद्धतीने नवापूर तालुक्यातून गुजरातला दारू तस्करी होत असते. अनेक वेळा पोलीसांनी कारवाई करून दारूसाठी व आरोपी यांना रंगेहाथ पकडले देखील आहे.