पावरा, सोनवणे गुरुजींसाठी विद्यार्थ्यांचा वाकला कणा; तरीही तुम्ही फक्त लढ म्हणा!

0

अमळनेर । तालुक्यातील कळमसरे येथील शारदा माध्यमिक विद्यालयातील दोन्ही शिक्षकांची बदली रद्द करावी यासाठी मागील आठवड्यात विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते तरीही शाळा प्रशासनाने गांभीर्याने दखल न घेतल्यामुळे आज सकाळी विद्यार्थ्यांनी पुन्हा आंदोलन करत ते उपोषणाला बसले त्यात 7 मुलींना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत . यापैकी एका विद्यार्थिनीला पुढील उपचारासाठी जळगाव येथे नेण्यात आले.

वापुर्वीही पालकांसह शाळेत ठिय्या आंदोलन
शारदा विद्यालयाचे उपशिक्षक सुरेश पावरा व के. जे. सोनवणे यांची संस्थास्तरावर किनोट (ता जळगाव) येथे शालेय प्रशासनाने बदली केली होती. त्यावेळी या दोन्ही शिक्षकांची बदली रद्द व्हावी यासाठी शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी शाळेच्या प्रवेशद्वारावर ठिय्या मांडला होता. गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन दिले होते त्यावेळी विद्यार्थ्यांनी शालेय पोषण आहारावर बहिष्कार टाकून एकही तास होऊ दिला नव्हता आश्वासनानंतर विद्यार्थ्याचे आंदोलन मागे घेण्यात आले होते परंतु आठ दिवस उलटूनही बदली रद्द करण्याबाबत ठोस निर्णय न झाल्यामुळे विद्यार्थ्यानीं उपोषणाला सुरवात केली

‘ सर परत या, नको हुकूमशाही’
आज शाळेतील सुमारे 200 विद्यार्थी शाळेच्या प्रवेशद्वारावर उपोषणाला बसले आमचे सर परत येत नाहीत तोपर्यंत उपोषण चालूच राहील असा पवित्रा विद्यार्थ्यानी घेतला ‘पावरा सर परत या, नको हुकूमशाही’ अशा घोषणा दिल्या . पाडळसरे, खेडी व वासरे येथील विद्यार्थ्यांनी गावात प्रभात फेरी काढत शाळा व्यवस्थापनाचा निषेध नोंदवला सकाळी शाळा सुरु होण्यागोदरच विद्यार्थी प्रवेशद्वारावर बसल्यामुळे शालेय कामकाज बंद होते आजही संतप्त विद्यार्थ्यांनी शालेय पोषण आहारावर बहिष्कार टाकत एकही तास होवू दिला नाही

दाखल्यांची मागणी
दरम्यान सकाळी 6.30 वाजेपासून बसून घोषणा देणार्‍या 7 विद्यार्थिनींची प्रकृती खालावली त्यात हर्षदा रनछोड पाटील(वय 11), नेहा मनोज चौधरी (13), विद्या युवराज पाटील (10), धनश्री विजय चौधरी( 13), मनीषा रणजितसिंग पाटील (13), गायत्री हेमंत पाटील( 13), रुचिका प्रकाश कुंभार( 13) यांना चक्कर व मळमळ होत असल्याने शासकीय रुग्णवाहिका बोलावून अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले त्यात हर्षदा पाटीलची प्रकृती जास्तच खालावल्याने तिला जळगावच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. विद्यार्थीप्रिय ,शिस्तप्रिय शिक्षकांची बदली अचानक बदली हेतुपुरस्सर केल्याचा आरोपही पालक व विद्यार्थ्यांमधून होत आहे. पालक व विद्यार्थ्याचे आंदोलन जोर धरत असल्याचे पाहून प्रशासनाने सपोनि अवतारसिंग चव्हाण यांना पाचारण केले परंतु विद्यार्थ्यांनी त्यांचे काहीच ऐकून घेतले नाही पालकांनी मुख्याध्यापकांकडे दाखला मागण्यास सुरवात केली आणि दुपारपर्यंत 25 दाखले देण्यात आले 150 विद्यार्थ्याच्या दाखला मागण्या मुख्याध्यापकांना देण्यात आल्या आहेत.