बारामती । बारामती तालुक्यात पावसाचे अत्यल्प प्रमाण आहे. त्यामुळे जनावरांच्या चार्याचा प्रश्न शेतकर्यांना भेडसावत आहे. पशुधन अडचणीत असल्याने तालुक्यातील बहुसंख्य शेतकर्यांनी जनावरे विक्रीला काढली आहेत. दूध दरवाढीमुळे जनावरांना लाखमोलाचा भाव मिळत आहे. जनावरे खरेदीसाठी राज्याच्या काही भागातून शेतकरी आणि व्यापारी बारामतीत येत आहेत. जनावरांना मागणी वाढल्याने जनावरांच्या किंमती देखील वाढल्या आहेत. चांगल्या जातींच्या गायी लाखांच्या घरात गेल्या आहेत. त्यामुळे शेतकरी फायद्यात आहेत. दर वाढ झाल्याने दुग्ध व्यवसायाला झळाळी आली आहे.
जनावरे बाजार फुलला
आधुनिक व्यवस्थापनाद्वारे दुग्ध व्यावसाय करणार्यांची संख्या देखील वाढत आहे. पुणे, सातारा, नगर तसेच सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आणि व्यापरी बारामतीच्या जनावरे बाजारात खरेदी-विक्रीसाठी येत आहेत. त्यामध्ये केवळ पारंपारिक पध्दतीने दुग्ध व्यावसाय करणार्या शेतकर्यांबरोबरच आधुनिक पद्धतीने दुग्ध व्यवसाय करणार्या ग्राहकांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात होती. यामध्ये शिक्षित तरुणांचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणवर आहे.
लाखोंची उलाढाल
बारामती तसेच आसपासच्या तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने जनावरांच्या चार्याचा प्रश्न भेडसावत आहे. त्यामुळे शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणात जनावरे विक्रीसाठी आणत आहेत. मागणी जास्त असल्याने जनावरांची संख्या जास्त असताना देखील जनावरांना चांगला भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या फायद्यात आहेत. इतर जिल्ह्यातील शेतकरी तसेच व्यापार्यांनी मोठ्या प्रमाणात जनावरांची खरेदी केली. त्यामुळे बाजार समितीच्या जनावरे बाजारात लाखोंची उलाढाल झाली. जवळपास 400 जनावरांची विक्री झाली. त्यामध्ये गायी, म्हशींचाही समावेश आहे.
जनावरे बाजाराची पाहणी
बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने दुग्ध व्यवसायाचे प्रशिक्षण दिले जाते. या व्यावसायाचे प्रशिक्षण घेणार्या विदर्भ, मराठवाडा तसेच खानदेशातील प्रशिक्षणार्थी शेतकर्यांनी बारामतीच्या जनावरे बाजाराची पाहणी केली. वेगवेगळया जातींच्या गायी, त्यांचे संगोपन तसेच व्यवस्थापनाचे धडे त्यांनी प्रत्यक्षात गिरवले. केव्हीकेचे डॉ. आर. एस. जाधव यांनी याबाबत मार्गदर्शन केले.
बाजार समितीला 45 हजाराचे उत्पन्न
बारामती बाजर समिती मार्फत जळोची उपबाजार येथे जनावरे बाजार भरविला जातो. पुणे जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील शेतकरी या बाजारात जनावरे खरेदी तसेच विक्रीसाठी येतात. बाजार समितीच्या वतीने त्यांना सुविधा पुरवल्या जातात. 350 ते 400 जनावरांची विक्री होते. यातून 40 ते 45 हजारांचे उत्पन्न बाजार समितीला मिळते, अशी माहिती बारामती बाजार समितीचे संचालक राजेंद्र बोरकर यांनी दिली.
350 जनावरांची विक्री
साधारणत: 60 हजार ते सव्वा लाख रुपयांपर्यंत गायी, म्हशींच्या किंमती गेल्या आहेत. याशिवाय शेळ्या, बोकड यांच्यादेखील किंमती वाढल्या असल्याचे चित्र आहे. बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जळोची उपबाजारात जनावरांचा स्वतंत्र बाजार भरतो. दुभती जनावरे विक्रीसाठी आणणार्या शेतकर्यांसाठी या बाजार आवारात चांगली सोय करण्यात आली आहे. समितीच्या आवारात पिण्याचे पाणी, जनावरे धुण्याची व्यवस्था, विक्रीपश्चात सेवा आदी सुविधा असल्याने तीन-चार जिल्ह्यातून शेतकरी या ठिकाणी येतात. साधारणत: 300 ते 350 जनावरांची विक्री होते.