बारामती । बारामती तालुक्याच्या जिरायती भागातील 42 गावे ही खरीपाच्या हंगामावरती अवलंबून आहेत. यात सुपा, काळखैरेवाडी, मोरगाव, लोणीभापकर, मासाळवाडी, पळशी, मुर्टी, मोढवे, ढाकाळे, मुढाळे, उंडवडी क.प., चांदगुडेवाडी आदी गावांचा समावेश आहे. या भागात जूनच्या पहिल्या पंधरवडयात 170 मिलीमीटर पाऊस झाला. मात्र गेल्या दिड महिन्यापासून पावसाने ओढ दिली आहे. शेतकर्यांना पेरणीनंतर चांगल्या पावसाची गरज असते. पावसाच्या प्रमाणावरती खरीप हंगामातील पिकांची पेरणी केली जाते. पावसाअभावी हंगाम वाया जाण्याची शक्यता असल्याची माहिती बारामती तालुका कृषी अधिकारी संतोषकुमार बरकडे यांनी दिली.
42 गावे तहानलेली
बारामती तालुका हा अवर्षणग्रस्त तालुका म्हणून ओळखला जातो. येथे रब्बीचा मुख्य हंगाम असतो. येथील जिरायती भागातील 42 गावे तहानलेली असतात. खरी कसोटी येथील शेतकर्यांचीच असते. मात्र निरा डावा कालव्यातून सतत पाणी वाहत असते. या कालव्यातील 40 टक्के पाणी वाया जाते. असे असूनदेखिल शेतकरी दुष्काळ म्हणून ओरडत असतात. हे अर्धसत्य आहे.
पाण्याच्या नियोजनाचा अभाव
जानेवारी ते मे 2017 असा अखंडपणे पाच महिने सातत्याने निरा डावा कालवा वाहत होता. हे पाणी कोठे गेले या विषयी अधिकारी काहीही माहिती द्यायला तयार नाही. तरीही बागायती भागातील शेतकरी दुष्काळ दुष्काळ म्हणून आंदोलन करीत होते. हे वास्तव नाकारता येत नाही. यंदाच्याही परिस्थितीत बारामती तालुक्यात 172 मिलीमिटर पाऊस झाला आहे. मात्र पावसाच्या पाण्याचे नियोजन बारामती तालुक्यात नाही हे पुन्हा एकदा सिध्द झाले.
दुबार पेरणी
जिरायती भागातील शेतकरी पावसावर अवलंबून असतो. खरिपाच्या पिकावरच या भागातील शेतकर्यांचे वर्षाचे आर्थिक गणित अवलंबून असते. जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात चांगल्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे जवळपास 9 हजार हेक्टरवर लागवड झाली. त्यापैकी 7 हजार हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी होईल, असा अंदाज व्यक्त केला होता. पण प्रत्यक्षात नऊ हजार हेक्टरवर पेरणी झाली. रब्बी हंगामातील पिके तालुक्याच्या दृष्टिने महत्त्वाची आहेत. खरीप हंगाम वाया गेला असला तरी त्याची दुबार पेरणी करता येत नाही. त्यामुळे ज्याठिकाणी दुबार पेरणी झाली तिही वाया जाण्याची शक्यता आहे. रब्बी हंगाम हमखास होत असल्याने खरीपातील दुबार पेरणीकडे शेतकरी पाठ फिरवितात, असे तालुका कृषी अधिकारी बरकडे यांनी सांगितले.