भंडारा : यावर्षी सुरुवात चांगल्या करणार्या व मधल्या काळात ओढ देणार्या पर्जन्यराजाने मुंबई कोकणसह गेल्या काही दिवसांपासून अनेक भागात पुन्हा जोरदार हजेरी लावली असली तरी पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया या जिल्ह्यातील शेतकरी अजूनही पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. यामुळे दरवर्षी तब्बल तेराशे मिलीमीटर एवढा पाऊस बरसणार्या या जिल्ह्यातील शेतकर्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.
मृग नक्षत्रात पाऊस बरसल्यानंतर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त होत असतो. या हंगामातदेखील पाऊस बरसल्यानंतर या दोन्ही जिल्ह्यातील शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त झाला होता. अनेकांनी शेतीची मशागत करीत धानाची पेरणीसुद्धा आपल्या शेतात केली होती. आज ना उद्या पाऊस जोमात बरसेल आणि मोठ्या प्रमाणात उत्पादन होईल, अशी आशा येथील शेतकर्याला होती. मात्र मृग नक्षत्र आटोपल्यानंतरही पावसाने दगा दिल्यामुळे अनेकांवर दुबार पेरणीची संकट ओढावले आहे.
… अन्यथा शेतकरी सापडणार आर्थिक संकटात
भंडारा जिल्ह्यात साधारणत: पावणेदोन लाख हेक्टरहून अधिक जागेवर धानाची लागवड होणार आहे. तर गोंदियात 1 लाख 80 हजार हेक्टर जमिनीवर धानाची लागवड होणार आहे. मात्र पावसाने ओढ दिल्याने अनेकांचा पेरण्या खोळंबल्या आहे. येत्या काही तासांत पाऊस झाला नाही तर अनेक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडण्याची भीती व्यक्त होत आहे.