पावसाचा जोर झाला कमी

0

पुणे । गेल्या 2-3 दिवसांपासून कोकण व घाटमाथा वगळता राज्यातील पावसाचा जोर कमी झाला आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत असून मुंबईतही हलक्या सरींवरच नागरिकांना समाधान मानावे लागत आहे. मराठवाड्यात नांदेडचा अपवाद वगळता पावसाने दडीच मारली आहे. दरम्यान, पोषक वातावरण निर्माण होऊन राज्यातील मान्सून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा एकदा सक्रिय होणार आहे. मराठवाड्यासह राज्यभर पुन्हा दमदार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. यामुळे नागरिकांना आता ऑगस्टची प्रतिक्षा करावी लागणार आहे.

दरम्यान, बुधवारी कोकणातील सावंतवाडी, चिपळूण येथे मध्यम स्वरुपाचा पाऊस तर घाटमाथ्यावरील कोयना, ताम्हिणी येथे जोरदार पावसाने हजेरी लावली. मध्य महाराष्ट्रातील महाबळेश्वर, लोणावळा येथे मुसळधार पाऊस बरसला तर पुण्यात हलक्या सरी पडल्या. मध्य राजस्थानवरील कमी दाबाचे क्षेत्र बुधवारी विरुन गेल्यामुळे व किनारपट्टी भागावरील समांतर कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव कमी झाल्यामुळे मध्य महाराष्ट्र, कोकण व मुंबईतील पावसाचा जोर कमी झाला आहे. पुढील पाचही दिवस राज्यातील पावसाचा जोर कमीच राहणार असल्याचे हवामान विभागाने नमूद केले आहे. गेल्या 24 तासांत सावंतवाडी 30 मि.मी, चिपळूण 20 मि.मी, मुंबई 10 मि.मी, महाबळेश्वर 50 मि.मी, लोणावळा 30 मि.मी, ताम्हिणी 50 मि.मी, कोयना 120 मि.मी पावसाची नोंद करण्यात आली.