पुणे । गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. त्यामुळे बळीराजा सुखावला आहे. शुक्रवार सकाळपासून पावसाच्या हलक्या सरी पडत असल्यामुळे अल्हादायक वातावरण निर्माण झाले होते. पुढील आठवड्याभरात शहरात मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे.
नैऋत्य मौसमी वार्याची उत्तरीसीमा स्थिर असल्याने गेल्या 24 तासात कोकण, गोव्यासह मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. मात्र मराठवाड्यात वडवणीमध्ये 4, सोयेगाव येथे 3 तर उत्तर गावांमध्ये प्रत्येकी 1 मिलीमिटर इतका पाऊस पडला. तर 17 जुलैपर्यंत कोकण-गोवा व मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी व मराठवाडा व विर्दभात काही ठिकाणी चांगला पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शहरात शुक्रवारी सकाळी 8 वाजेपर्यंत 26.0 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. तर 1 जूनपासून आतापर्यंत 258.8 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. शनिवारी पावसाच्या काही सरी पडण्याची शक्यता असून 18 ते 20 जुलैपर्यंत मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.