पुणे । सतत कोसळणार्या पावसाने शहराला झोडपून काढले आहे. बुधवारी पहाटेपासून पावसाची संततधार सुरू होती. यामुळे सखल भागातील रस्तेही पाण्याखाली गेले होते. सर्वत्र पाण्याची तळी साचली होती. यातून मार्गक्रमण करताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत होती. धरणक्षेत्रातही पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे खडकवासला धरणातून 22,880 क्युसेकने विसर्ग सुरू होता. यामुळे भिडे पुल पाण्याखाली गेल्याने रस्ता बंद करण्यात आला होता. पालिका आयुक्तांनी सकाळी 6 वाजता पुलाची पाहणी केली.
गेल्या दोन दिवसांपासून शहरात पावसाची रिपरिप सुरूच आहे. सकाळपासून पाऊस सुरुच ासल्याने गटारे तुंबून त्यातून पाणी वाहत आहे, यातून वाट काढताना पुणेकरांना मोठा त्रास सहन करावा लागला. यामुळे विद्यार्थी व नोकरदारांचे हाल झाल्याचे चित्र दिसत होते.
9 हजार 416 क्यसेक्स पाण्याचा विसर्ग
पुण्यात पावसाचा जोर बुधवारीही कायम होता. मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातून 23 हजार क्युसेक्सपेक्षा जास्त पाणी सोडण्यात येत होते. या हंगामात सोडलेले हे सर्वाधिक पाणी असल्याचे म्हटले जात आहे. पुण्यातील भिडे पूल आणि त्याशेजारील नदीपात्रातील रस्ता पाण्याखाली गेला आहे. मुळा नदीहीही दुथडी भरून वाहत असून नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाल्याने विसर्गही कमी करण्यात आला. संध्याकाळी 9 हजार 416 क्यसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू होता.
भिडे पूल पाण्याखाली
पावसाचा जोर बुधवारीही कायम होता. धरणक्षेत्रात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातून 23 हजार क्युसेक्स पाणी सोडण्यात आल्यामुळे भिडे पूल आणि त्याशेजारील नदीपात्रातील रस्ता पाण्याखाली गेला होता. मुळा नदीही दुथडी भरून वाहत आहे.
महापौर, आयुक्तांचा पाहणी दौरा
सोमवारपासून शहर व परिसरात संततधार पडत असलेल्या पावसाचा जोर वाढल्यामुळे खडकवासला धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू होता. त्यामुळे सिंहगड रोड परिसरातील आनंदनगर भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्याठिकाणी महापौर मुक्ता टिळक आणि मनपा आयुक्त कुणाल कुमार यांनी अधिकार्यांसमवेत पाहणी केली. महानगरपालिकेच्या सर्व यंत्रणाना सज्ज राहण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. तसेच नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
मदतीसाठी हेल्पलाईन
पावसामुळे कोणतीही आपत्ती उद्भवल्यास महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या 202 205501269 / 25506800 / 25506801 / 25506802 / 25506803/ 25506804 या क्रमांकावर, तसेच अग्निशमन दलाच्या मदतीसाठी 101 या क्रमांकावर, पोलीस यंत्रणेच्या मदतीसाठी 100 या क्रमांकावर तसेच 020-25501133 / 25501130 या क्रमांकावर सुरक्षारक्षकांच्या मदतीसाठी संपर्क करता येणार आहे. ही सेवा 24 तास सुरू आहे.