मुंबई (जनशक्ति चमू) । गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे चिंतेचे वातावरण असतांना लागोपाठ दुसर्या दिवशी सर्वत्र पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे शेतकर्यांची चिंता काही प्रमाणात तरी कमी होणार आहे. अनेक ठिकाणी या पावसामुळे दुबार पेरणी केलेल्या पीकांना जीवदान मिळणार आहे. दरम्यान, पावसाअभावी पोळा सणावर असणारे औदासिन्याचे सावटदेखील यामुळे दुर होण्यास मदत होणार आहे. तर राज्याच्या अनेक भागात अतिवृष्टीमुळे पुरस्थिती उद्भवल्याचे दिसून येत आहे. विशेष करून मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पाऊस झाला असून खान्देशसह राज्याच्या अन्य भागांमध्येही पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे पीकांना जीवदान मिळणार असून अनेक ठिकाणची संभाव्य पाणी टंचाईदेखील नाहीशी होणार आहे. गोदावरी नदीला मोठा पूर आला असून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झाला आहे. तर नाशिक, पुण्यातही पावसाने हजेरी लावली आहे. महाराष्ट्रात अजून दोन दिवसांपर्यंत मोठ्या प्रमाणात पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
हवामान खात्याचा होता अंदाज
राज्याच्या हवामान खात्याने 19 व 20 ऑगस्ट रोजी राज्यातल्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस होणार असल्याचा इशारा दिला होता. मात्र पुर्वानुभव पाहता हवामान खात्याच्या या इशार्याची खिल्ली उडविण्यात आली. यात शनिवारी दुपारपर्यंत पाऊस न आल्यामुळे यावरून सोशल मीडियात प्रचंड चर्चा रंगली. मात्र शनिवार दुपारपासून सुरू झालेला पाऊस रविवारीदेखील दिवसभर सुरूच राहिली.
गोदावरीला पूर
नाशिक जिल्ह्यात शनिवारी रात्रभरापासून पावसाने दमदार हजेरी लावली असून रविवारीदेखील पाऊस सुरूच होता. यामुळे गोदावरी नदीला मोठा पूर आला आहे. जिल्ह्यातील त्रंबकेश्वर, इगतपुरी आदी तालुक्यांमध्येही अतिवृष्टी झाली आहे. गंगापूर धरणातून सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास गोदावरी नदीपात्रात 2 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यांनतर धरणातुन दुपारी एक वाजता 4680 क्यूसेक विसर्ग करण्यात आला. त्यामुळे गोदावरी नदीपात्रात पाण्याची पातळी वाढली आहे.
मराठवाडा-विदर्भ चिंब
दरम्यान, शनिवारपासून सुरू असणारा पाऊस रविवारी दिवसभर सुरू असल्याने मराठवाडा आणि विदर्भातल्या बहुतांश भागात समाधानकारक वातावरण आहे. औरंगाबादसह लातूर, परभणी, नांदेड, जालना आदी जिल्ह्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. मराठवाड्यात शनिवारी संध्याकाळनंतर सर्वत्र पावसाचा जोर वाढल्याचे चित्र पहायला मिळाले. रविवारी देखील मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर कायम होता. मराठवाड्यातील 170 मंडळांत गेल्या 24 तासात अतिवृष्टी झाली आहे. यामुळे एकूण पाच जणांचा बळी गेल्याचे वृत्त आहे. तर यामुळे नदी-नाल्यांना पुर आले असून जलसाठ्यांमध्ये समाधानकारक वाढ झाली आहे. तर दुसरीकडे विदर्भातदेखील समाधानकारक पाऊस झाला आहे.
खान्देशात संततधार
मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पाऊस होत असतांना शनिवारी खान्देश व मध्य महाराष्ट्राचा बराच भाग कोरडा होता. तथापि, रविवारी सकाळपासूनच खान्देशच्या बहुतांश भागामध्ये पावसाने जोर धरला. दुपारनंतर जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील बर्याच भागांमध्ये पावसाने हजेरी लावली. जळगाव शहरात दुपारून मुसळधार पावसाचे आगमन झाले.