पावसाचे दमदार ‘कमबॅक’!

0

पुणे/नाशिक : दोन आठवड्याच्या विश्रांतीनंतर पावसाचे राज्यात पुन्हा दमदार पुनरागमन झाले आहे. पुणे शहरासह जिल्ह्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली. या पावसाने धोक्यात आलेली पिके तग धरू शकणार आहेत. इंद्रायणी नदीला पूर आला असून, नाशिकमध्येही गोदावरीने पूररेषा ओलांडली होती. नाशिक शहरात पूरसदृशस्थिती निर्माण झाली होती. पंचवटी मोरेमळा परिसरातील नाल्यात एक शाळकरी मुलगा वाहून गेला होता. कोकण, मराठवाडा, मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रातही पावसाने हजेरी लावली. येत्या 24 तासांत कोकण, गोव्यासह मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

राज्यात सर्वदूर पावसाची हजेरी
पुणेसह जिल्ह्यात शुक्रवारी पावसाने हजेरी लावली. पिंपरी-चिंचवड परिसरातही पाऊस झाला. तथापि, काही भागात तुरळक तर काही भागात जोरदार असा तो बरसला. लोणावळा व मावळ भागात दमदार पाऊस झाल्याने पर्यटकांचे चांगलेच हाल झाले. इंद्रायणी, पवना या नद्यांना पूर आला होता. मराठवाड्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली. नांदेड, बीड, परभणी, औरंगाबाद या जिल्ह्यात दिवसभर पाऊस सुरुच होता. जळगाव, भुसावळमध्येही मुसळधार पाऊस झाला. कोकणातील रायगड, सिंधूदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वेची वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती. मुंबईसह उपनगरांतही मुसधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. पश्चिम महाराष्ट्रातही चांगला पाऊस झाला असून, अहमदनगरमध्येही काल रात्रीपासून जोरदार पाऊस सुरु होता. मुळा-भंडारदरा धरणक्षेत्रात जोरदार पाऊस सुरु असल्याने ही धरणे लवकरच भरतील, अशी शक्यता होती.