रेन वॉटर हार्वेस्टिंगकडे बारामती नगरपालिकेने फिरवली पाठ : 16 लाखांची उधळपट्टी
बारामती । जलसंवर्धनासाठी राज्य शासन रेन वॉटर हार्वेस्टिंगसारख्या योजनेवर भर देत आहे. असे असताना बारामती नगरपालिकेने मात्र स्वतःच्या मालकीच्या बहुउद्देशीय वाहनतळ इमारतीवरील रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्याच्या प्रस्तावाकडे पाठ फिरवली आहे. पावसाचे पाणी जिरवण्याऐवजी ते गटारात सोडण्याचा घाट नगरपालिकेने घातला असून स्टॉर्म वॉटरच्या नावाखाली 16 लाख रुपयांची उधळपट्टी केली गेल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे.
नवीन बांधकामांसाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा राबविण्याची सक्ती राज्य शासनाने केलेली आहे. बारामतीत स्थानिक नागरिकांनी जलपुनर्भरण मोठ्या प्रमाणात करावे, यासाठी त्यांना मालमत्ता करात सूट देण्याचा निर्णय नगरपालिकेने घेतला. मात्र, नगरपालिकेने पुरेशी जनजागृती न केल्याने या योजनेला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. जर सामान्य नागरिकांना रेन वॉटर हार्वेस्टिंगची सक्ती असेल, तर नगरपालिकेने याकडे दुर्लक्ष का केले? असा सवाल करीत शासनाच्या धोरणानुसार काम करण्याऐवजी स्वतःचे हितसंबंध जोपासण्यासाठी काम करणार्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
पावसाचे पाणी सोडले नदीत
रेन वॉटर हार्वेस्टिंग तर दूरच राहिले. परंतु, बहुउद्देशीय वाहनतळ इमारतीवर पडणारे पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी यंत्रणेने तब्बल 16 लाख रुपये खर्च करून पाईपलाईन घातली आहे. हे पाणी कुठेही उपयोगात आणण्याऐवजी चक्क कर्हा नदीत सोडले जाणार आहे. जनतेच्या कररूपी पैशाची नगरपालिका अशा प्रकारे विल्हेवाट लावत आहे.
समन्वय आणि दूरदृष्टीचा अभाव
बारामती शहरातील भूजल पातळी खालावलेली आहे. नीरा डाव्या कालव्याचे आवर्तन बंद झाल्यानंतर अनेक भागातील कुपनलिका कोरड्या पडतात. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येते. त्यामुळे शहरातील प्रत्येक इमारतीस रेन वॉटर हार्वेस्टिंग अत्यावश्यक आहे. मात्र, शासनाचा नगररचना विभाग, नगरपालिकेने नियुक्त केलेले सल्लागार आणि नगरपालिकेचा बांधकाम विभाग यांच्यात समन्वयाचा आणि दूरदृष्टीचा अभाव यामुळे बहुउद्देशीय वाहनतळ इमारतीला रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यात आलेले नाही. याबाबत सर्व संबंधितांना विचारले असता हे तिन्ही विभाग एकमेकांवर जबाबदारी ढकलून मोकळे होत आहेत. पाणी जिरवण्यापेक्षा एकमेकांची जिरवण्यातच अधिकारीही धन्यता मानत आहेत.
रेनवॉटर हार्वेस्टिंग बंधनकारक
शहरातील रहिवाशांना जसे इमारतींसाठी रेनवॉटर हार्वेस्टिंग बंधनकारक आहे, तोच नियम नगरपालिकेलाही लागू आहे. मात्र, नियमांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, त्यांनीच कायदा पायदळी तुडवत बहुउद्देशीय इमारतीच्या रेन वॉटर हार्वेस्टिंग अंदाजपत्रकात तरतूदच केलेली नाही. नगरपालिकेच्या बांधकाम विभागानेही हे कबूल केले आहे. नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी बहुउद्देशीय वाहनतळ इमारतीला रेन वॉटर हार्वेस्टिंग करून घेणार असल्याचे सांगितले. नगरपालिकेने नियुक्त केलेल्या कन्सल्टन्सीकडून मूळ अंदाजपत्रकातील रक्कमेतूनच ते करून घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.