होळनांथे। जून महिन्याचा शेवटचा आठवड येऊन ठेपला असून अद्याप समाधानकारक पाऊस झाला नसल्याने तालुक्यातील, जिल्हाभरातील शेतकर्यांच्या पेरण्या रखडल्या आहेत. पावसाची दांडीने शेतकरी चिंतातूर झाला असल्याचे दिसून येत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा पावसाचे आगमन लवकर होणार असल्याचे समजले होते. त्यानुसार शेतकरी खरीपपुर्व मशागती करून पावसाच्या प्रतिक्षेत होते. परंतु पावसाने दांडी मारल्याने खरीप हंगामाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत.
65 हजार हेक्टर कापूस लागवड अपेक्षित
यंदा बर्यापैकी व लवकर पावसाचे आगमन होणार असल्याचे हवामान खात्यान वर्तवले होते. म्हणून सलग तीन वर्षापासून दुष्काळ सदृश्य परिस्थितीत असलेला शेतकरी सुखावला होता. मृग नक्षत्राच्या सुरवातीस पावसाचे आगमनही झाले. परंतु गेल्या आठवडाभरापासून पाऊस गायब झाला असून पेरण्या खोळंबल्या आहेत. यात जिल्ह्यात कापसाची सर्वाधिक लागवड होत असते. त्यात शिरपूर तालुक्यात 65 हजार हेक्टर कापुस लागवड होणे अपेक्षीत आहे. त्यापैकी बागायतदार शेतकर्यांची कापुस लागवड झाली असून कोरडवाहू शेतकरी अद्याप पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. पावसाला उशीर झाल्यास कापसाचे सिझन हुकले जाण्याची शक्यता असून नाईलाजास्तव शेतकर्यांना इतर पिकांची पेरणी करावी लागणार आहे. त्याचप्रमाणे बागायती शेतातील पिकांनाही पावसाच्या पाण्याची आवश्यकता भासू लागली आहे. जुन महिना संपण्यात आला असून अद्याप पाऊस नसल्याने पावसाविषयी विविध अंदाज बांधले जात आहेत.