पावसाच्या पाण्याने बंधारे भरल्यामुळे श्रमदानास लाभले फळ

0

भुसावळ । तालुक्यातील किन्ही शिवारात जलयुक्त शिवार अंतर्गत सिमेंट बंधारे उभारण्यात आले तर रासेयो विद्यार्थ्यांनी श्रमदानाद्वारे दगड, मातीचे बांध बांधले असून सिमेंट बंधारे बांधण्याअगोदर त्या जागेचे योग्यरित्या पाहणी न करताच बंधारे उभारल्यामुळे सिमेंट बंधार्‍यापेक्षा दगड, मातीच्या बंधार्‍यांमध्येच पावसाचे पाणी साचले असल्याचे दिसून आले आहे. यामुळे शासनाने केलेला लाको रुपयांचा खर्च व्यर्थ गेला असून यासंदर्भात पर्यावरणप्रेमी संस्थांनी सर्वेक्षण केले असून त्यांना ही बाब आढळून आली.

अधिकार्‍यांना केवळ काम पुर्ण करण्याची घाई
राज्य शासनातर्फे दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्यभरात ठिकठिकाणी जलयुक्त शिवार अंतर्गत बंधारे उभारण्यात आले. यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च देखील करण्यात आला आहे. यामागे शासनाचा हेतू चांगला आहे. मात्र संबंधित अधिकारी वर्ग केवळ काम पुर्ण करुन ते शासनदरबारी दाखविण्याची घाईमुळे जागेची पाहणी न करताच बंधारे उभारले आहेत.

जमिनीची पाहणीची आवश्यकता
याचे काम करण्यासाठी जमिनीचा उतार, पाणी झिरपण्याची क्षमता आदी बाबींचा विचार करणे आवश्यक होते. इंडियन वॉटर वर्क असोसिएशन मुंबईचे आजीवन सदस्य सुरेंद्र चौधरी व ग्रीन अर्थ संस्थेचे संजीव पाटील, मिलींद भारंबे यांच्या पथकाने किन्ही शिवारात केलेल्या निरीक्षणात मनुदेवी मंदिरामागील जलयुक्त शिवार अंतर्गत उभारण्यात आलेला सिमेंट बंधारा कोरडाठाक तर त्याच्या उत्तरेकडील पाटचारी नाल्यावर नाहाटा महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी श्रमदान करुन बांधलेल्या दगड, मातीच्या चारही बंधार्‍यांमध्ये भरपूर पाणी अडत असल्याचे चित्र दिसून आले.

कष्टाचे झाले चीज
रासेयोच्या विद्यार्थ्यांनी कुठलाही खर्च न करता केवळ श्रमदानातून या परिसरातील दगड- गोटे एकत्र करुन उतरत्या जमिनीवर या दगडांचा बांध उभारला आहे. यामुळे या बंधार्‍यांमध्ये पावसाचे पाणी साचले असून विद्यार्थ्यांनी केलेले श्रमदान फळास आले असून त्यांच्या कष्टाचे यामुळे चीज झाले असल्याचे दिसून येत आहे.