पावसाच्या पुनरागमनाने खरीप पिकांना नवसंजीवनी

0

तळेगाव दाभाडे : मावळ तालुक्यात पावसाचे जोरदार पुनरागमन झाल्यामुळे खरीप पिकांना फायदा झाला आहे. त्यामुळे शेतकरीवर्गाकडून समाधान व्यक्त केले जात आहे. गेल्या दोन दिवसांपासून मावळात संततधार पाऊस सुरू आहे. महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने पिके कोमेजू लागली होती. मात्र, वेळेवर पाऊस आल्याने पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. खरीप हंगामातील भुईमूग, सोयाबीन, भात या पिकांना पावसामुळे लाभ झाला असून, बागायती क्षेत्रातील उसाच्या वाढीसाठीही हा पाऊस लाभदायक आहे. पावसाच्या पाण्याने भात खाचरे तुडूंब भरली आहेत. या पावसामुळे रब्बी पिकांच्या पूर्व मशागतीस गती येणार येईल, अशी माहिती माळवाडी येथील शेतकरी गोरख दाभाडे यांनी ‘जनशक्ति’शी बोलताना दिली.

भात पिकाची सर्वाधिक लागवड
मावळ तालुक्यात खरीप हंगामात भात पिकाचे लागवडीखालील क्षेत्र तीस हजार एकरापेक्षा जास्त आहे. जुलै महिन्यात भात लागवडीच्या वेळी मान्सूनचा समाधानकारक पाऊस झाल्याने यावर्षी जवळपास शंभर टक्के भात लागवडी पूर्ण झाल्या. या लागवडीस दीड ते दोन महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला असून, आता दुसर्‍या टप्प्यातही चांगला पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला आहे. पावसाची उघडीप मिळताच पूर्व पट्ट्यातील रब्बी पिकांच्या पेरणीपूर्व कामाला गती येईल. ज्वारी, गहू, हरभरा, करडई या पिकांच्या मशागती चांगल्या होतील, असा विश्वास शेतकर्‍यांकडून व्यक्त होत आहे.

नद्या-नाले दुथडी
पावसाने महिनाभरापासून विश्रांती घेतली होती. परंतु, दोन दिवसांपासून मावळात पाऊस सुरू झाला असून, पावसाच्या जोरदार आगमनाने नद्या, ओढे-नाले दुथडी भरून वाहत आहेत. तालुक्यातील विविध धरणांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. भात खाचरे पाण्याने तुडूंब भरली आहेत. मावळ आणि परिसरातील पावसाचे जोरदार पुनरागमन झाल्याने शेतकरी सुखावला आहे.