भुसावळ । गेल्या 15 दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाचे शहरासह परिसरात बुधवार 28 रोजी सायंकाळच्या सुमारास पुनर्रागमन झाले़ आभाळात अनुकूल वातावरण असूनही पाऊस पडत नव्हता, पावसाने बर्याच दिवसांपासून वरुणराजाने ओढ दिल्याने बळीराजा चांगलाच धास्तावला होता. मात्र अचानक पावसाने हजेरी लावत शेतकर्यांना सुखद धक्का दिला आहे़.
खरीपाच्या पिकांना मिळणार आधार
शेतकर्यांनी पावसाळ्याच्या तोंडावर आपल्या पेरण्या आटोपल्या आहेत. मात्र पावसाने दडी मारल्यामुळे दुबार पेरणी करावी लागते कि काय? अशी भिती शेतकर्यांमध्ये होती. आभाळात ढग भरुन येऊनही पाऊस मात्र पडेना, यामुळे शेतकरी चांगलाच चिंतातुर झाला होता. मात्र बुधवारी सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास अचनाकपणे आभाळ भरुन येऊन वरुणराजा चांगलाच बरसला. यामुळे पिकांना काही प्रमाणात का होईना आधार मिळाला आहे.
आठवडाभर पावसाची हजेरी आवश्यक
सध्या शेतांमध्ये पिकांना कोंब येऊ लागले असून अशा वेळेत पिकांच्या चांगल्या वाढीसाठी आणखी जोरदार हजेरीची आवश्यकता आहे. किमान आठवडाभर तरी पाऊस असाच सुरु राहिल्यास पिके तग धरुन राहतील. पर्यायाने शेतकर्यांना याचा चांगला फायदा होऊ शकतो. यासाठी शेतकरी देवाच्या आराधना करताना दिसत आहे.
वातावरण थंडावले
सायंकाळच्या सुमारास अचानकपणे जोरदार पावसाने हजेरी लावली़ त्यामुळे बाजारात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांसह व्यावसायिकांची धावपळ उडाली. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून दिवसभर जाणवत असलेल्या उकाडा काहीसा कमी झाला. तसेच परिसरातील खरीप पिकांना दिलासा मिळाला असून, शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे़. या पावसामुळे तालुक्यातील गावांमध्ये सखल भागातून पाणी वाहिले़ दिवसभर तालुक्यात ढगाळ वातावरण होते.