मुंबई:- राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी विधानभवनात उत्साहाचे वातावरण दिसून आले. सकाळपासून सुरू असलेल्या पावसाच्या रिपरिपीत महाराष्ट्र विधानसभेच्या सदस्यांनी मोठ्या उत्साहात मतदान केले. या मतदानासाठी विधानभवन परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावला गेला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विधानसभा सदस्य असलेले मंत्री व विरोधी पक्षाच्या एकूण 287 सदस्यांनी मतदान केले. यासोबतच राज्यसभेचे सदस्य असलेले संजय काकडे यांनीही इथे मतदान केले. सकाळच्या सत्रात मतदानासाठी गर्दी होती. दुपारी 2 वाजेपर्यंत ही गर्दी ओसरल्याचे चित्र होते. 4 वाजेपर्यंत जवळपास मतदान संपले होते.
क्षितिज ठाकूर अनुपस्थित
या निवडणुकीत राज्यातील 288 पैकी 287 सदस्यांनी मतदान केले. बहुजन विकास आघाडीचे वसई विधानसभा क्षेत्रातील आ. क्षितिज ठाकूर हे परदेशात असल्याने मतदानाला येऊ शकले नाहीत. बहुजन विकास आघाडीचे आ. ठाकूर यांचे मतदान कुणाला होणार? हे माहिती नसले तरी यामुळे एक मत हे उघडपणे वाया गेल्याचे निश्चित झाले. ठाकूर वगळता सर्वच सदस्यांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला.
विधानपरिषद सदस्यांची उपस्थिती
राष्ट्रपती निवडणुकीसाठी विधानपरिषद सदस्यांना मतदान करण्याचा अधिकार नसतो. मात्र आज मतदानाच्या ठिकाणी विधानपरिषद आवारात प्रवेशद्वारावर विधानपरिषदेचे सदस्य बराच वेळ थांबलेले दिसून आले. यावेळी खुद्द विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे देखील बराच वेळ उपस्थित होते. मुंडे यांनी छगन भुजबळ यांचे स्वागत करून गेटपर्यंत जायला आधार देखील दिला. याचबरोबर हरिभाऊ राठोड, वंदना चव्हाण, अनंत गाडगीळ यांच्यासह आणखी काही विधानपरिषद सदस्य उपस्थित असल्याचे दिसून आले.