पावसाच्या विश्रांतीमुळे भुशी धरणाकडे जाणार मार्ग सुरु

0

लोणावळा: लोणावळा परिसरात जोरदार पाऊस झाल्याने भुशी धरणाकडे जाणारा मार्ग बंद करण्यात आला होता. दरम्यान आता पावसाने थोडीसी विश्रांती घेतल्याने भुशी धरणाकडे जाणारा रस्ता पुन्हा पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. आज रविवार सकाळपासून पावसाचा जोर कमी झाला आहे, त्यामुळे भुशी धरणाकडे जाणार मार्ग लोणावळा पोलिसांनी खुला केला आहे. मात्र, धरणाच्या पायऱ्यांवरून येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाचा वेग प्रचंड असल्याने पर्यटकांनी काळजी घ्यावी असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील यांनी केले आहे. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी खंडाळा प्रवेशद्वार, वलवण प्रवेशद्वार येथून घुबड तलावापर्यंत पोलिसांचा विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

लोणावळा शहर आणि ग्रामीण परिसरात गेल्या ४८ तासात मुसळधार पाऊस कोसळला आहे. शनिवार रविवारची सुट्टी आणि त्यात धो धो पडणारा पाऊस यामुळे लोणावळा परिसरातील सर्व पर्यटनस्थळे गर्दीने फुलून गेली आहेत. तलाव आणि धरणे ओसंडून वाहत आहेत. मात्र पावसाचा जोर पाहता लोणावळ्यामधील भुशी धरणाकडे जाणारा मार्ग शुक्रवारपासून बंद करण्यात आला होता. अखेर आज सकाळी तो मार्ग पर्यटकांसाठी पुन्हा खुला करण्यात आला आहे. मात्र पाण्याचा जोर पाहता पर्यटकांनी काळजी घ्यावी असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.