पावसाने उघडीप देताच खुरपणीच्या कामास वेग

0

तळेगाव दाभाडे – गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाने काहीशी उघडीप दिल्याने शेतकर्‍यांच्या कामाला पुन्हा वेग आला आहे. पूर्व मावळातील शेतकरी सध्या खरीप भुईमुग आणि सोयाबीन पिकांच्या खुरपणीच्या कामात व्यग्र आहेत.

गेला महिनाभर मान्सूनचा जोरदार पाऊस तालुक्याच्या सर्व विभागात पडत होता. या पावसाने मावळातील पवणा, वडिवळे, आंद्रा, कासारसाई आणि जाधववाडी ही धरणे पूर्ण भरलेली असून धरणांच्या सांडव्यावरून पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे नद्यांना पूर आले होते.

चांगला पाऊस झाल्याने खरीप भात पिकांची लागवड शंभर टक्यापेक्षा जास्त झाली. तर खरीप भुईमुग आणि सोयाबीन तसेच कडधान्यांच्या पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. मावळ तालुक्याच्या पूर्व भागात खरीप भुईमुग आणि सोयाबीन पिका बरोबरच कडधान्याच्या पेरण्या वेळेत होऊन पिकही चांगले आलेले आहे, तसेच काही भागात खुरपण्याची कामे वेगाने सुरु झाली आहेत. यंदा चांगल्या पावसाने भात पिकाच्या लागवडी 100 टक्यापेक्षा जास्त झाल्याने शेतकरी समाधानी आहेत तर आता भात पिकाच्या दुस-या टप्प्यातील कामांना सुरुवात करण्यात आलेली आहे.