पावसाने दडी मारल्याने शासनाने दुष्काळ जाहिर करावा

0

धुळे । तालुक्यात यावर्षी पावसाने दडी मारली असून दुबार पेरणीकरुनही शेतकर्‍यांच्या हाती काहीच लागत नाही. त्यामुळे शासनाने ताबडतोबीने दुष्काळ जाहिर करावा आणि तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी धुळे तालुका काँग्रेसच्यावतीने धुळे ग्रामिणचे आ.कुणाल पाटील, जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती मधुकर गर्दे, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष भगवान पाटील यांनी केली आहे.

विविध मागण्यांचे निवेदन देण्यासाठी यांची होती उपस्थिती
मृग नक्षत्राच्या सुरुवातीला पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पहिल्या आठवड्यातच शेतकर्‍यांनी पेरणी पुर्ण केली. मात्र जुलै महिन्यापासून पाऊस गायब आहे. दुबार पेरणीनंतरही पावसाअभावी पिके माना टाकत आहेत. पावसाचे कोणतेच लक्षण दिसत नाही. आता पाऊस आला तरी पिके हाती लागणार नाहीत अशी परिस्थिती आहे. सध्या तीन गावांना टँकरने पाणी पुरवठा सुरु असून इतर अनेक गावांनाही पाणी टंचाईची झळ बसत आहे. त्यामुळे धुळे तालुक्यातील सर्व महसुली मंडलामध्ये पिंकांचा संयुक्त पंचनामा करण्यात यावा, दुष्काळ परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या अधिकार्‍यांचे पथक बोलवावे, शेतसारा माफ करावा, विज बिल माफ, पिक कर्जाचे पुर्नगठण करावे, आणेवारी 50 पैश्यांच्या आत लावावी, चारा छावण्या सुरु कराव्यात, जि.प. पाणीपुरवठा विभागाच्या टंचाई आराखड्याला मुदत वाढ द्यावी, टंचाई भागात पाण्याचे टँकर सुरु करण्यात यावे किंवा बोअरवेल्स, विहिरी आधीग्रहित कराव्यात, अशी मागणी आ.कुणाल पाटील यांच्यासह जि.प.अध्यक्ष शिवाजीराव दहिते, खरेदी विक्री संघाचे चेअरमन लहु पाटील, पं.स. सदस्य गुलाबराव कोतेकर, दुध संघाचे चेअरमन वसंत पाटील, अशोक सुडके, दिनेश भदाणे, शांताराम राजपूत, बाजीराव पाटील, डॉ. गिरासे, विजय गजानन पाटील, पंढरीनाथ पाटील, भानुदास माळी, प्रा.दत्ता परदेशी, दिनेश सुरेश पाटील, बुररझडचे सरपंच, शरद माळी, यशवंत भदाणे, विरेंद्र जाधव, राजू तावडे, राजु मालचे यांनी केली आहे.