पुणे : मान्सूनच्या हंगामातील पहिल्या महिन्यात पुणे शहरात सरसरीपेक्षा 50 टक्के जास्त पाऊस झाला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, 1 जूनपासून आतापर्यंत 212.09 मिलीमीटर पाऊस पडला. ही आकडेवारी गेल्यावर्षीच्या तुलनेत सरासरीपेक्षा 50 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. चांगला पाऊस झालेल्या राज्यातील पाच जिल्ह्यांमध्ये पुणे जिल्ह्याचाही समावेश आहे. जिल्ह्यातही या हंगामातील पाहिल्या महिन्यात समाधानकारक पाऊस झाल्याचे हवामान विभागाच्या आकडेवारीवरून दिसून येत असले तरी मागील आठवड्यात पावसाचे प्रमाण काहीसे कमी झाले आहे.
पाणीसाठ्यात वाढ अपेक्षित पुणे शहरात सर्वत्र चांगला पाऊस आतापर्यंत पडला आहे. 12 जूनला (27 मिलीमीटर), 14 जूनला (56 मिलीमीटर) आणि 30 जूनला (17 मिलीमीटर) झालेल्या पावसामुळे पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली. परंतु, पुणे शहराला पाणी पुरवठा करणार्या धरणांच्या पाणीसाठ्यात अजूनही वाढ होणे अपेक्षित आहे. आतापर्यंत झालेल्या पावसामुळे पवना आणि पानशेत धरण 30 टक्के भरले आहे तर वरसगाव आणि टेमघर धरणातील पाणीसाठ्यात अद्याप वाढ झालेली नाही.
5 जुलैपासून प्रमाण वाढलेहवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या दोन-तीन दिवसात पावसाचे प्रमाण थोडे कमी होणार असून, 5 जुलैपासून ते पुन्हा वाढेल. 2 जुलैरोजी कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य-महाराष्ट्र विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर 3 व 5 जुलैरोजी कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी तर मध्य-महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. 2 व 3 जुलैरोजी कोकण-गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.