पावसामुळे फुलतेय आंबोली…

0

आंबोली: कोकणातील आंबोली घाट परिससर पर्यटकांच्या दृष्टीने महत्त्वाचा असून गेल्या काही तासात झालेल्या चांगल्या पावसामुळे व सलगच्या सुट्ट्यांमुळे पर्यटक आंबोली गाट परिसर व धबधब्याचा आनंद घेण्यासाठी वळल्याचे दिसून आले. यावर्षीच्या वर्षा पर्यटनाच्या पहिल्याच रविवारी व सोमवारी (रमजान ईद) सुट्टी असल्याने पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. विशेष म्हणजे शनिवारी रात्री चांगला पाऊस झाल्याने आंबोली घाट परिसर फुलून गेला तर रविवारप्रमाणे सोमवारीही हिरण्यकेशी, कावळेसाद, महादेवगड, नांगरतास धबधबा आदी पॉइंट्सवर रविवारी असंख्य पर्यटकांनी गर्दी केल्याचे दिसून आले.

हॉटेल्स हाऊसफुल्ल
कावळेसाद तसेच महादेवगड पॉइंट येथील निसर्ग, खोलदर्‍या व दर्‍यांमध्ये कोसळणार्‍या पाण्याचे वार्‍याच्या झोतासोबत आलेले फवारे यांचा आस्वाद येथे आलेल्या पर्यटकांना घेता आला. सलग शासकीय सुटी आल्याने येथील सर्व हॉटेल्स हाऊसफुल्ल होती. हजारो पर्यटकांमुळे व्यावसायिकही खूश झाले आहेत. हजारो पर्यटक येथे दाखल झाले होते. मुख्य धबधब्यासोबत सर्वच पॉइंट्सवर पोलिसांचा चोख बंदोबस्त केल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.