पुणे : राज्यातील अनेक भागात पाऊस झाला असून पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात शनिवारी रात्रीपासून पावसाची संततधार सुरू होती. रविवारीही सकाळपासून पाऊस होत असल्याचे चित्र होते. विशेष पाऊस सुरु होताच पर्यटनाचा आनंद घेणारे अनेक पर्यटक या भागात येत असून रविवारीही मुळशी धरण परिसरात सुरु असलेल्या पावसामुळे मुळशी धरण जलाशयाच्या परिसरात आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची पावले या परिसराकडे वळु लागली होती. माले घाट, पळसे धबधबा, ताम्हिणी घाट, पिंपरीची दरी ही येथील पर्यटकांची आवडती ठिकाणे आहेत. मुळशी धरण परिसर पावसाळ्यात चांगल्या प्रकारे फुलत असून आताच्या पावसाने ओढे, नाले, डोंगरांच्या ओहळी, धबधब्यांच्या पाणी प्रवाहीत होऊ लागले असल्याने पावसाळ्यातील सुखद चित्र कसे असेल याचा अंदाज येऊ लागला आहे. दरम्यान, आज सकाळी आठ वाजेपर्यंत लोणावळा येथे 150 मिमी, पवना धरण परिसरात 98 मिमी, वडगाव परिसरात 62 मिमी,तळेगाव-दाभाडे परिसरात 48 मिमी पावसाची नोंद झाली असल्याची माहिती देण्यात आली.