दोन्ही मार्गावरील काही प्रवासी गाड्या रद्द, लांब पल्ल्याच्या गाड्या 5 ते 6 तास उशिरा धावल्या
भुसावळ- मुंबई व नाशिक येथे सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईकडून येणारी व जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. काही ठिकाणी रेल्वे रुळ खचल्याने तर काही ठिकाणची खडी वाहून गेल्याने या दोन्ही मार्गावरील काही प्रवासी गाड्या रद्द करण्यात आल्या आहे तर लांब पल्ल्याच्या गाड्या 5 ते 6 तास उशिरा धावत असल्याने प्रवाशांचे ‘मेगाहाल’ झाले. रेल्वे प्रशासनाकडून प्राप्त माहितीनुसार मुंबईहून मध्यरात्री सुटणार्या आणि सकाळच्या सत्रातील सर्व रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या. रविवारी मुंबईकडून येणारी एकही गाडी न आल्यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. तसेच दुसरीकडे जळगावहून मुंबईकडे जाणार्या गाड्याही विलंबाने धावत होत्या. बहुतांश गाड्या इगतपुरी व नाशिकपर्यंत धावल्या. यामुळे मुंबईकडे जाणार्या प्रवाशांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. दरम्यान सोमवारी भुसावळ-नाशिकरोड शटलसह हुतात्मा एक्सप्रेस व भुसावळ-मुंबई पॅसेंजर, अमरावती एक्सप्रेस व तुलसी एक्सप्रेस या गाड्या सोमवारीही रद्द करण्यात आल्या आहेत.
सेवाग्राम एक्सप्रेस नाशिकहून माघारी
नागपूर मुंबई सेवाग्राम एक्सप्रेस रविवारी मुंबईला न जाता, नाशिकपर्यंतच धावली. तर हीच गाडी नागपूरकडे जाण्यासाठी नाशिकहूनच माघारी फिरुन नागपूरकडे रवाना झाली. तर मुंंबई-जबलपूर व दुरंतो एक्सप्रेसही नाशिकपर्यंत धावली. तसेच मुंबई- हावडा एक्सप्रेस मनमाडपर्यंत व जनता एक्सप्रेस देवळालीपर्यंत धावली.
रद्द करण्यात आलेल्या गाड्या
मुंबई लखनऊ पुष्पक एक्सप्रेस, मुंबई हावडा गीतांजली एक्सप्रेस, गोरखपूर काशी एक्सप्रेस, लोकमान्य टिळक कामाख्या, लोकमान्य टिळक भागलपूर, गोरखपूर गोदान एक्सप्रेस, दरंभागा पवन एक्सप्रेस, वाराणसी कामायनी एक्सप्रेस, लोकमान्य टिळक गोरखपूर, मुंबई हावडा सुपरफास्ट एक्सप्रेस, कानपूर उद्योगनगरी एक्सप्रेस, सुलतान पूर सुपरफास्ट एक्सप्रेस, मुंबई गोंदिया विदर्भ एक्सप्रेस, मुंबई अमरावती एक्सप्रेस, मुंबई फिरोजपूर पंजाब मेल, मुंबई नागपूर दूरंतो एक्सप्रेस, मुंबई हावडा सुपरफास्ट एक्सप्रेस, मुंबई हावडा व्हाया अलाहाबाद, लोकमान्य टिळक शालिमार, गोरखपूर कुशीनगर एक्सप्रेस या गाड्यांचा समावेश असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.