पावसाळी अधिवेशनात सरकारी वाहनांच्या ऐवजी ‘ओला’!

0

अधिवेशनादरम्यान खाजगी कंपन्यांनीही कार्यालये हलवण्यास दर्शवली असमर्थता

मुंबई (निलेश झालटे) :– नागपूरमध्ये 4 जुलैपासुन सुरु होणाऱ्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारी वाहनांच्या ऐवजी खाजगी टॅक्सींचा वापर केला जाणार आहे. सरकारच्या वतीने ‘ओला’ या खाजगी कंपनीकडून 200 गाड्या भाडेतत्वावर घेण्यात येणार आहेत. 100 पर्यावरणपूरक शून्य प्रदुषण करणाऱ्या गाड्या आणि 100 टॅक्सी यादरम्यान भाड्याने घेण्यात येणार आहेत. नागपुरमध्ये याआधीच 100 पर्यावरणपूरक वाहने आहेत. या वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन्स पूर्ण नागपूर शहरात उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. तर या अधिवेशनाच्या दरम्यान भाड्याने घेण्यात येणाऱ्या 200 गाड्यांपैकी 100 गाड्या शहरात बाहेरगावाहून येणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी तैनात ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती मिळाली आहे.

कार्यालये हलविण्यास अडचणी
पहिल्यांदाच पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये ४ जुलैपासून सुरु होत आहे. नागपूरला अधिवेशन होण्याची घोषणा उशिरा झाल्याने संपूर्ण मंत्रालय नागपूरला हलविण्यास अडचणी येत आहेत. मुंबईत आमदार निवासाची इमारत पाडून नवी इमारत बांधण्यात येणार असल्याने अधिवेशनात आमदारांच्या निवासाची व्यवस्था नसल्याचे कारण सरकारच्या वतीने पुढे करण्यात येत आहे. नागपूरमध्ये देखील हिवाळी अधिवेशनाव्यतिरीक्त तिथल्या बंगल्यांची आणि मंत्री कार्यालयांची जागा 11 महिन्याच्या कराराने खाजगी कार्यालयांना देण्यात येते आता ही खाजगी कार्यालये इतक्या कमी कालावधीत दुसरीकडे हलविण्यास तयार नसल्याने राज्य सरकारची पंचाईत झाली आहे.

गणित जमवणे सरकारला अवघड
मंगळवारी वेधशाळेने जुलै महिन्यात नागपुर परिसरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे सभागृहात मित्रपक्ष शिवसेनेसह कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे विरोधक आणि सभागृहाबाहेर या नियोजनाबाबतचे गणित जमवणे सरकारला अवघड जाणार आहे. या आठवड्यात यासंदर्भात बैठक घेउन अधिवेशनादरम्यान सरकारी कार्यालय नागपूरमध्ये कशा रितीने वसवता येईल यासंबधी आराखडा तयार केला जाणार आहे. या पावसाळी अधिवेशनाचा कालावधी 4 जुलै ते 20 जुलै असा असणार आहे. अधिवेशनात 19 विधेयके मांडण्यात येणार असुन त्यातली 10 विधेयके प्रलंबित विधेयके तर 9 नवीन विधेयके असणार आहेत.