पावसाळी अधिवेशनानंतर मंत्रीमंडळ विस्ताराची शक्यता 

0

मुंबई (प्रतिभा घडशी) – पावसाळी अधिवेशनानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. तोवर बंडखोर कॉंग्रेस नेते नारायण राणे यांचा भाजपाप्रवेश झाल्यास त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे. राणेंसोबत समर्थक आमदार कालिदास कोळंबकर यांचाही भाजपात प्रवेश निश्चित मानला जात आहे. गेल्याच आठवड्यात कोळंबकर यांनी कॉंग्रेसवर टीका करून भाजप प्रवेशाचे संकेत दिले होते.

नारायण राणे यांच्या प्रवेशानंतर त्यांचे पुत्र नितीश राणे यांना मंत्रिमंडळात स्थान द्यावे, असे ठरले होते; पण 1990 पासून सतत निवडून येणारे कालिदास कोळंबकर नाराज होतील म्हणून राणेंनी स्वतःच मंत्रिमंडळात जाण्याचे ठरवले आहे. याव्यतिरिक्त कॉंग्रेसचे काही आमदार भाजपात जाण्यास इच्छुक असून त्यांच्या प्रवेशाचा निर्णय तूर्त लांबणीवर टाकण्यात आला आहे.

उद्धव, फडणवीस विरोधात
सुरुवातीला उध्दव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणे यांना शिवसेना किंवा भाजपमध्ये प्रवेश देवू नये, असे ठरवले होते. मात्र, नारायण राणे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यामार्फत प्रयत्न केले. त्यानंतर पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी मुख्यमंत्र्यांनाच अहमदाबाद येथे नारायण राणे यांना घेऊन बोलावले होते. परंतु माध्यमांना ही बातमी कळविण्याची व्यवस्था केली गेल्याने ती भेट उघड झाली होती. त्यांतर नारायण राणे थांबले होते. या काळात त्यांनी व मुलांनी कॉंग्रेसवर शरसंधान सुरूच ठेवले होते. जाहीर ट्विट करून पक्षाला अडचणीत आणले गेले. इंदू सरकार प्रकरणात मधुर भांडारकरची पाठराखण केली गेली. 

नाथाभाऊंना हिरवा कंदील नाही!
माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा पुनर्प्रवेश लांबणार आहे. न्या.झोटिंग समितीचा अहवाल सरकारला मिळाला असला तरी या अहवालात खडसे यांना क्लीन चीट नाही. त्याचबरोबर हायकोर्टातही सर्व गोष्टी त्यांच्या विरोधात जात आहेत. त्यामुळे त्यांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाला अजून हिरवा कंदील मिळालेला नाही.