पावसाळी अधिवेशनापूर्वीच विरोधकांत फुटीचे चित्र!

0

शेकाप, समाजवादी पक्ष, लोकभारती, माकप नेत्यांची अनुपस्थिती

निलेश झालटे, नागपूर : विरोधी पक्षांच्या पत्रकार परिषदेला काँग्रेस-राष्ट्रवादी वगळता इतर विरोधी पक्षाचे कोणीही गटनेते उपस्थित नसल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे. परंपरेप्रमाणे विरोधी पक्षाच्या पत्रकार परिषदेला मागील सर्व अधिवेशन काळात काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत सर्व लहान मोठे विरोधी पक्षांचे प्रतिनिधी असतात. मात्र पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षासोबतचे घटक पक्ष उपस्थित नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

पावसाळी अधिवेशनात सरकारची कोंडी करू, असा दावा करणाऱ्या विरोधकांमध्ये अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पहिल्याच दिवशी फूट पडल्याचे चित्र दिसून आले. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील आणि धनंजय मुंडे यांनी निमंत्रित केलेल्या विरोधी पक्षांच्या पत्रकार परिषदेला शेतकरी कामगार पक्ष, माकप, समाजवादी पक्ष, लोकभारतीसह आणि अपक्ष आमदारांनी पाठ फिरवली.

काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते व जोगेंद्र कवाडे यांचा अपवाद वगळता इतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी दांडी मारल्यामुळे विरोधकांच्या तंबूत चिंतेचे वातावरण परसले. पहिल्याच दिवशी या लहान पक्षांनी झटका दिल्याने काँग्रेस व राष्ट्रवादीला शॉक बसला आहे. मित्रपक्षांच्या गैरहजेरीत झालेल्या पत्रकार परिषदेत विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भाजप-शिवसेना या सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली.