पावसाळी अधिवेशन मुंबई की नागपूर?

0

अधिवेशनाबाबत ११ एप्रिलला होणार निर्णय

मुंबई:- आतापर्यंत विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबईतच घेतले जात आहे. परंतु हे पावसाळी अधिवेशन आता नागपुरात घेण्याबाबत सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अद्याप यावर अंतिम निर्णय झाला नसून पावसाळी अधिवेशन मुंबईत की नागपुरात याचा निर्णय ११ एप्रिलला बैठकीत केला जाणार आहे, अशी माहिती संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी दिली.

राज्य सरकारचे अर्थसंकल्पीय वर्ष जानेवारी ते डिसेंबर असे असावे. त्याचप्रमाणे पावसाळी अधिवेशन नागपुरात घेतले जावे यासाठी सरकारचा आग्रह आहे. नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात नागपूरमध्ये पावसाळी अधिवेशन घेण्यासाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, उद्योगंमत्री सुभाष देसाई आणि संसदीय कामकाजमंत्री गिरीष बापट यांची समितीही नेमण्यात आली आहे. मंगळवारी पावसाळी अधिवेशनासंदर्भात गिरीष बापट यांना विचारले असता ते म्हणाले, पावसाळी अधिवेशनाचा अंतिम निर्णय ११ एप्रिल रोजी होणार्‍या बैठकीत घेतला जाणार आहे. नागपूरमधील आमदार निवास वगळता सरकारी निवासाच्या जागा ११ महिन्यांसाठी भाड्यावर दिल्या जातात. त्यामुळे पावसाळी अधिवेशनात कर्मचार्‍यांच्या निवासासाठी पर्यायी व्यवस्था किंवा आहे त्याच जागा रिकाम्या करावी लागणार आहेत. याविषयीचा तोडगा ११ एप्रिलच्या बैठकीत निघाल्यासच पावसाळी अधिवेशन नागपूरला होणार आहे, असे बापट यांनी सांगितले.