पर्यटकांनो वर्षा पर्यटनाचा आनंद घेताना हुल्लडबाजीला घाला आळा
लोणावळा नगरपरिषद प्रशासनाचे आवाहन
लोणावळा- पावसाळी पर्यटनासाठी राज्यभरातील पर्यटकांचे सर्वाधिक आकर्षणाचे ठिकाण असलेला लोणावळा व खंडाळा परिसर पावसाला सुरुवात झाल्यापासून पर्यटनस्थळे पर्यटकांनी हाऊसफूल होऊ लागली आहे. कौटुंबिक पर्यटकांसह तरुण-तरुणी मोठ्या प्रमाणात शनिवार व रविवारी पर्यटनासाठी येऊ लागल्याने परिसर पर्यटकमय झाला आहे. पावसाला सुरुवात होताच रविवारी भुशी धरणाच्या जलाशयात एका युवा पर्यटकाचा मृत्यू झाला. पर्यटकांचा अतिउत्साह, निष्काळजीपणा व हुल्लडबाजी हे अपघातांना कारणीभूत ठरत आहेत. येणार्या पर्यटकांनी व तरुणाईने पर्यटनाचा आनंद घेताना हुल्लडबाजीला आळा घालत निखळ पर्यटनाचा आनंद लुटावा, असे आवाहान प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
तरूणाईकडून होते हुल्लडबाजी
भुशी धरणात वारंवार होणारे अपघात रोखण्यासाठी धरणाच्या पायर्यांवरील भिंतीला सुरक्षेकरिता काटेतार लावण्यात आली आहे. तरी काही पर्यटक डोंगरबाजूकडून धरणात उतरण्याचा प्रयत्न करतात. असाच प्रयत्न रविवारी झाला. सुरक्षेकरिता पोलीस बंदोबस्त नसल्याने मोठ्या प्रमाणात पर्यटक धरणाच्या पाण्यात उतरले होते. काही तरुण-तरुणी धरणाच्या दक्षिणेकडे असलेल्या डोंगरामधील धबधब्यांखाली वर्षाविहाराचा आनंद घेण्यासाठी धोकादायकपणे डोंगरमाथ्यावर जातात. सहारा पुलासमोरील धबधबा परिसरात देखील तरुण डोंगरावरुन वाहणार्या पाण्यातून उलट्या दिशेने डोंगरावर जाण्याचा प्रयत्न करतात. लायन्स पाँईट व टायगर पाँईट परिसरात सुरक्षेकरिता लावण्यात आलेल्या लोखंडी रेलिंगच्या पुढे दरीच्या तोंडावर बसून सेल्फी काढण्यासाठी जाणे असे धोकादायक प्रकार सर्रास पाहायला मिळतात. गिधाड तलावातून वाहणार्या धबधब्याखाली बसणे धोकादायक आहे. यदा कदाचित पाण्याच्या प्रवाहात पाय घसरल्यास थेट दरीत पडण्याशिवाय गत्यंतर नसताना देखील तरुण तरुणाई खबरदारी न घेता हुल्लडबाजी करतात. खंडाळा राजमाची पाँईट येथे दरीला रेलिंग नसल्याने येथे दरीच्या अगदी तोंडाजवळ जाणे धोकादायक असताना देखील खबरदारी घेतली जात नाही.
सुरक्षित पर्यटनाला प्राधान्य
लाखोंच्या संख्येने पर्यटक शहरात व पर्यटनस्थळांवर येतात. त्यांनी स्वंयशिस्त पाळत हुल्लडबाजीला आळा घालत सुरक्षित पर्यटनाला प्राधान्य देणे गरजेचे आहे. आपल्या घरी कोणी तरी आपली वाट पाहत आहे. याचे भान प्रत्येकाने ठेवत सुरक्षितपणे लोणावळा खंडाळा परिसरातील पावसाचा, हिरव्यागार निर्सगाचा, डोंगरांमधून तसेच रस्त्यांच्या कडेने वाहणार्या धबधब्यांचा, धुक्याच्या व ऊन सावल्यांच्या लपंडावाचा आनंद घ्यावा, असे आवाहन पोलीस प्रशासन व लोणावळा नगरपरिषद प्रशासनाने केले आहे. तरूणाईकडून होणार्या चुकीच्या गोष्टींमुळे आनंदावर विरजण पडू शकते. खोल पाण्यात जाऊन पोहण्यासाठी प्रयत्न करणार्या मुंबईतील तरूणाचा नुकताच मृत्यू झाला आहे. पोलिसांनी केलेले नियम हे आपल्या चांगल्यासाठी असतात. आपले अतीधाडस आपल्या किंवा आपल्या जीवलगांच्या जीवावर बेतू शकते. त्यामुळे पर्यटकांनी वर्षा विहाराचा आनंद नियमांच्या चौकटीत राहून घ्यावा.
काय खबरदारी घ्यावी
आपण पर्यटक म्हणून लोणावळ्यात किंवा अजुन कोठेही गेलात तरी काही गोष्टींची खबरदारी घ्यावी लागते. यापैकी महत्वाच्या गोष्टी पुढीलप्रमाणे. धरणाच्या पाण्यात उतरु नये, दरीच्या तोंडापर्यंत जाण्याचा मोह टाळावा, पर्यटनासाठी जाताना आपण कोठे जातो आहे याची माहिती घरात द्यावी, गड, किल्ले व लेणी परिसरात जाताना माहित नसलेले शॉर्टकट न घेता रुळलेल्या वाटांनी प्रवास करावा, मद्यप्राशन करुन वाहने चालवू नयेत तसेच पर्यटनस्थळांवरही मद्य प्राशन करु नये, रस्त्यावर कोठेही वाहने थांबवून डेकच्या आवाजात नाचत वाहतुकीला अडथळा करु नये, डोंगरभाग निसरडा झालेला असल्याने धोकादायकपणे डोंगरभागात जाणे टाळावे, पर्यटनस्थळांवर लावलेल्या सूचनांचे पालन करावे तसेच स्थानिकांच्या सूचनांकडे दुलर्क्ष करु नका.