पावसाळ्याआधी नालेसफाई करा

0

भुसावळ। संपूर्ण देशभरात स्वच्छता अभियान राबविले जात असून भुसावळ शहरातदेखील याची नितांत आवश्यकता आहे. स्वच्छता व आरोग्याची काळजी घेणे ही महत्वपूर्ण बाब आहे. त्यामुळे पावसाळा सुरु होण्याअगोदर शहरातील मुख्य नालेसफाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते भिमराव नरवाडे यांनी केली आहे. यासंदर्भात पालिका मुख्याधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले आहे.

शहरात बलबलकाशी नाला, पंचशिल नगर, गौसियानगर, काझी प्लॉट या भागातून जावून पुढे खालामा दरगाह, मरिमाता मंदिराजवळून जावून जुना सातारा परिसरात जातो. याच मार्गात 32 खोली भागातून येणारा दुसरा मोठा नाला रामदास वाडी, ग्रीन पार्क, खडका रोड येथून पुढे पापा नगर, काझी प्लॉटलगत मरिमाता मंदिराजवळ जावून मिळतो तसेच तिसरा नाला पंधरा बंगला भागातून येवून नसरवानजी फाईल, मटन मार्केट, जाम मोहल्ला भागातून जुना सातारा परिसरात मिळतो. हे तिन्ही नाले जुना सातारा भागात येत असल्याने याठिकाणी सांडपाण्याचा प्रवाहदेखील अधिक असतो. त्यामुळे पावसाळ्याअगोदर नाल्यातील कचरा सफाई झाल्यास सांडपाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होणार नाही. तसेच परिसरात दुर्गंधी व डासांचा प्रादुर्भाव फैलावण्यास आळा बसेल. पावसाळ्यात या नाल्यामुळे परिसरातील रहिवाशांच्या घरात पाणी शिरुन मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. त्यामुळे जेसीबीच्या सहाय्याने नाल्यांमधील कचरा उपसून त्याचे खोेलीकरण करण्यात यावे. येत्या आठ दिवसात नाल्यांचे काम सुरु न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा भिमराव नरवाडे यांनी दिला आहे.