पावसाळ्यातही बोदवड तहानलेले

0

बोदवड। सध्या पावसाळा सुरु आहे. यादरम्यान सर्वत्र पावसाने चांगलीच हजेरी लावून असून बोदवड तालुका मात्र पावसाचे प्रमाण अल्प असल्याने तीव्र पाणी टंचाईच्या झळा जाणवत आहेत. तालुक्यातील ग्रामीण भागात 15 ते 20 दिवसांआड पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांना ऐन पावसाळ्यातही पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. शेतातील विहरींची पाणी पातळी देखील जेमतेम असल्यामुळे असून प्रशासनाने याकडे लक्ष देऊन नागरिकांचे होणार्‍या हाल अपेष्टा थांबवून पाणी पुरवठ्याची व्यवस्था करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीतर्फे तहसिलदार भाऊसाहेब थोरात यांची भेट घेऊन त्यांना समस्या सोडविण्यासंदर्भात पाठपुरावा करण्याची मागणी केली आहे.

पशुधनही सापडले संकटात
तालुक्यात पावसाचे प्रमाण अल्प असल्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील पाण्याचे स्त्रोत आटले आहेत. त्यामुळे बर्‍याच गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. ओडीएचे पाणी पंधरा ते वीस दिवसांनंतर येते. पाण्याअभावी ग्रामस्थांचे तर हाल होताच मात्र गुरांच्या पाण्याची सुध्दा समस्या भेडसावत आहे. गुरांनाही पिण्यासाठी पाणी उपलब्ध होऊ शकत नसल्यामुळे पशुधनही संकटात सापडले आहे. त्यामुळे प्रशासनाने यासंदर्भात त्वरीत उपाययोजना कराव्यात आदी मागण्यांचे निवेदन तहसिलदार भाऊसाहेब थोरात यांना देण्यात आले.

शेतकर्‍यांच्या पदरी निराशा
तालुक्यात पाऊस उशिर झाल्याने शेतकर्‍यांनी पेरणी करुनही पाण्याअभावी पिकेवर आलीच नाही. त्यामुळे शेतकर्‍यांना दुबार पेरणी करावी लागली. यानंतरही पावसाने मध्येच दडी मारल्यामुळे उळीद, मुंग, सोयाबीन, मका या पिकांची वाढ खुंटली असून या उत्पादनातून शेतकर्‍यांचा खर्च सुध्दा निघणार नाही. त्यामुळे मजुरांची मजूरी देणे तसेच बियाणे, खतांचा खर्च काढावा तरी कसा अशी समस्या शेतकर्‍यांसमोर उभी ठाकली असून तालुक्यातील शेतकरी हवालदील झाला आहे. मात्र शासनाकडून कुठलीच मदत करण्यात येत नसल्यामुळे शेतकर्‍यांच्या पदरी निराशाच येत असल्याची टिकाही राष्ट्रवादीतर्फे करण्यात आली आहे.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी तहसिलदारांनी भेट घेवून त्यांच्याकडे शेतकर्‍यांच्या समस्यांबाबत आपले म्हणणे मांडले. शेतकर्‍यांचे संपुर्ण कर्ज सरकार माफ करावे, विज बिल माफ करावे, टंचाईग्रस्त गावांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. रोजगार हमी योजनेचे कामे सुरु करावी शेतकर्‍यांचे कर्जमाफीचे अर्ज न भरताना त्यांचे सोसायटीचे व बँकेचे कर्ज माफ करावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. निवेदनावर राष्ट्रवादीचे जिल्हा नेते अ‍ॅड. रविंद्र पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. उध्दव पाटील, तालुकाध्यक्ष शालीग्राम काजळे, साळशिंगी सरपंच दिपक चौधरी, मानमोडी सरपंच सतीष पाटील, सुरवाडा खुर्द सरपंच निलेश पाटील, सुरवाडा बु. सरपंच अनिल पारधी, मनोहर सुरवाडे आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.