पिंपरी-पावसाला सुरुवात झाली असून त्यापूर्वी पिंपळे सौदागर भागातील नालेसफाईची कामे पूर्ण झाली आहेत. आता पावसाळ्यात वाहणारे पाणी साचून राहणार नाही, अशी माहिती नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी दिली.
पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाई व्यवस्थित करायला हवी. अन्यथा नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होतो. त्यामुळे पावसाला सुरुवात होण्यापूर्वीच नालेसफाई करणे आवश्यक आहे. पिंपळे सौदागर परिसरातील नालेसफाई शत्रुघ्न काटे व नगरसेविका निर्मलाताई कुटे यांनी महापालिका प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपूर्वक करून पूर्ण करून घेतली.
महापालिकेच्या आरोग्य विभागाला पावसाळा सुरु होण्यापूर्वी परिसरातील सर्व स्टॉर्म वॉटर लाईन, ड्रेनेज लाईनची सफाई करण्याचे आदेश दिले होते. याची अंमलबजावणी करत आरोग्य विभागाने युद्ध पातळीवर पिंपळे सौदागर प्रभागातील सर्व चेम्बर, ड्रेनेज लाईन, स्टॉर्म वॉटर लाईनची सफाई करण्याबाबत ‘नाला साफसफाई’ हे अभियान सुरु केले. काही दिवसांमध्ये कामगारांनी चोख काम केल्यामुळे पावसाळा सुरु झाल्यानंतर प्रभागातील गटारी, नाले तुंबणार नाहीत. स्टॉर्म वाटर लाईन पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होणार असून त्यामुळे पावसाचे पाणी कुठेही साचणार व तुंबणार नाही, असेही काटे यांनी सांगितले.