पावसाळ्या अगोदर रस्त्यांवर पाणी

0

जळगाव। शहरात विविध परिसरात गटारी तुडुंब भरल्याने नाल्याचे घाण पाणी रस्त्यावर साचले असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न शहरात निर्माण झाला आहे. नागरिकांच्या अनेक तक्रारी जळगाव महापालिके मध्ये जात आहेत. मात्र पावसाळ्या पूर्वीच शहरात नागरिकांचे रस्त्यावर चालणे देखील मुश्कील झाले आहे. या प्रकरणी आयुक्त जीवन सोनवणे यांनी शहरात पाहणी करण्याची गरज आहे. रस्त्यावर गटारीच्या घाण पाण्यामुळे संपूर्ण परिसराला तलावाचे स्वरूप आले होते. आरोग्य विभाग किती बेईमानी पद्धतीने शहराच्या स्वच्छतेचे काम करीत असल्याचा पुरावा जनशक्तीने वूत्तात दिलेल्या छायाचित्रात दिसून येते. यामुळे पावसाळ्या पूर्वीच घाणीच्या आणि कचर्‍याच्या विळख्यात अडकलेल्या नाल्याची सफाई होणे गरजेचे असल्याची मागणी नागरिकान मधून होत आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या रस्त्यावर गटारीचे पाणी
शहरातील नागरिकांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात जावे लागते. मात्र तोच परिसर गटारीच्या घाण पाण्याच्या विळख्यात अडकल्याने नागरिकांचा चिंतेचा विषय बनला आहे. महापालिकेतील आरोग्य विभाग सुस्त असल्याची टीका नागरिकांमधून होत आहे. जनतेने निवडून दिलेले पदाधिकारी अधिकार्‍यावर विश्वास ठेऊन कामे करतात पण अधिकारीच अशा प्रकारे बेपर्वाई करतात यामुळे नागरिकांच्या समस्या सोडविणार कोण? असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहे. तत्काळ पावसाळ्या पूर्वीच नाले साफसफाईची मोहीम राबविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

आरोग्य विभाग झोपेत
शहरातील मुख्य नाल्याचे प्रवाह असलेले मार्ग साफ सफाई होण्याची गरज निर्माण झाली आहे. गेल्या काळात पावसाळा सुरु होण्यापूर्वीच महिन्या आगोदर शहरात साफ सफाई मोहीम महापालिकेच्या वतीने राबविण्यात येत होती. पण आता पर्यत महापालिकेच्या वतीने नाले सफाईची मोहीम राबविण्यात येत नसल्याने गटारीचे पाणी रस्त्यावर येत आहे. गेल्या तीन वर्षापूर्वी सतत सुरु असलेल्या पावसाने जळगाव शहरात आहाकार माजविला होता. यामुळे संपूर्ण शहरात रात्र भर चाललेल्या पाण्याने संपूर्ण शहर वेठीस धरले होते. आगामी काळात पाऊस मोठ्या प्रमाणावर असणार असल्याचे संकेत हवामान खात्याकडून वर्तविण्यात आले आहे.