पावसाळ्या सुरू होण्याआधी शहर खड्डे मुक्त करा

0

आमदार जगतापांच्या प्रशासनाला सूचना

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरामध्ये सर्वत्र खडड्यांमुळे रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. शहरातील वर्दळीच्या ठिकाणी रस्त्यावर पावसामुळे आणि जड वाहतुकीमुळे खड्डे निर्माण होतात. पावसाळ्यात या खड्ड्यांचा आकार वाढून खोली वाढते. त्यामुळे वाहन चालकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पावसाळा सुरु होण्या अगोदर संपूर्ण शहर खड्डे मुक्त करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात यावी, अशी सूचना भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी पालिका प्रशासनास लेखी निवेदनाव्दारे केली आहे.

सर्वांनी कामाची गती वाढवावी
याबाबत दिलेल्या निवेदनात जगताप यांनी म्हटले आहे की, शहर विकासाची कामे करावी लागणार आहेत. त्यामुळे सर्व अधिकारी व आयुक्तांनीही आपल्या कामाची गती वाढवावी. शहरातील खड्डेमुक्त रस्त्यांची मोहीम हाती घेण्यात यावी. मंदावणार्‍या वाहतुकीला गती देण्यासाठी आणि छोटया-मोठया खड्डयांमुळे होणारे पादचार्‍यांचे अपघात टाळण्यासाठी महापालिकेने शहरातील रस्ते दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत.

शहरामध्ये विकासकामांसाठी खोदलेल्या रस्त्यांची अद्याप दुरुस्ती करण्यात आली नसून, या खड्ड्यांमुळे अपघातसदृश स्थिती निर्माण झाली आहे. शहरात पावसामुळे रस्त्यांची दुरावस्था होती. त्यामुळे शहरातील सखल भागात साचणार्‍या पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी उपाययोजना करण्यात यावी. शहरात पदपथांबरोबरच काही ठिकाणी रस्ते आणि चौकांमध्ये पेव्हरब्लॉक बसविण्यात आले. अनेक ठिकाणच्या चौकांमध्ये पेव्हरब्लॉक उखडले गेल्यामुळे खड्डे पडले असून त्याचा वाहतुकीवर परिणाम होत आहे, असेही जगताप यांनी म्हटले आहे.