पाशा पटेल यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब

0

मुंबई : माजी आमदार पाशा पटेल यांची राज्य कृषिमूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्तीवर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. यासाबंधीचे शासन आदेश शनिवारी काढण्यात आले. विविध पिकांसाठी येणारा उत्पादन खर्च आणि त्यानुसार शेतकऱ्याला आवश्‍यक असलेला भाव काय असावा, याची शिफारस करण्याची जबाबदारी या आयोगावर असणार आहे. शेतीमालाच्या हमीभावाचा लढा उभारणारे मराठवाड्यातील चळवळीतील नेते अशी पटेल यांची ख्याती आहे. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि कृषीमालाला योग्य भाव मिळावा यासाठी सदैव प्रयत्नशील राहील, अशी प्रतिक्रिया निवडीनंतर पाशा पटेल यांनी दिली आहे.

राज्यात केंद्राच्या धर्तीवर राज्य कृषी मूल्य आयोगाची स्थापन करण्यात आली आहे. पटेल यांची खरे तर केंद्रीय कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती होणार असल्याची चर्चा गेली दोन वर्षे होती. मात्र त्यावर केंद्राने अद्याप निर्णय घेतलेला नाही. पटेल यांच्या दिल्लीतील नियुक्तीसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे स्वतः आग्रही होते. राज्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मोठे आंदोलन झाले. हे आंदोलन मागे घेण्यासाठी राज्यसरकारने आयोगाच्या स्थापनेचे आश्वासन दिले होते. सरकारने आयोग स्थापन केला असून पटेल यांची नियुक्ती झाली आहे. त्यांच्या पदाला राज्यमंत्र्यांचा दर्जा असेल. पटेल हे शेतकरी संघटनेतून पुढे आलेले लातूरमधील कार्यकर्ते आहेत. शरद जोशींच्या नेतृत्त्वाखालील अनेक आंदोलनात त्यांनी भाग घेतला होता.