गेल्या दोन वर्षांत विविध शहरात पोस्टामध्ये 11 पासपोर्ट सेवा केंद्र
मुंढवा केंद्रातील अपुर्या कर्मचार्यांचा फटका अर्जदारांना
पुणे : पुणे विभागात चोहोबाजूला पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्याचा धडाका लावलेल्या परराष्ट्र मंत्रालयाने पासपोर्ट अधिकार्यांची संख्या वाढविण्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे. मुंढवा पासपोर्ट सेवा केंद्रातील अपुर्या मनुष्यबळाचा फटका अर्जदारांना सहन करावा लागतो आहे. एरवी अर्ध्या तासात होणार्या अर्जाच्या तपासणीसाठी अडीच ते तीन तास रांगेत थांबण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. पासपोर्ट प्रक्रिया सुलभ करण्याच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या धोरणानुसार पुणे विभागामध्ये गेल्या दोन वर्षांत विविध शहरात पोस्टामध्ये 11 पासपोर्ट सेवा केंद्र सुरू झाली आहेत.
अंतिम छाननीसाठी नवीन अधिकार्यांची नेमणूक नाही
पुणे विभागातील सर्व अर्जदारांना पूर्वी प्रत्येक कामासाठी पुण्याला फेर्या माराव्या लागत होत्या. आता मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये पासपोर्ट अर्ज स्वीकारले जातात. त्यामुळे नागरिकांना त्यांच्या जवळच्या शहरामध्ये अर्ज भरणे शक्य होत आहे. मात्र, ही केंद्र सुरू करताना मंत्रालयाने पासपोर्ट अर्जाची अंतिम छाननी करणार्या नवीन अधिकार्यांची नेमणूक केलेली नाही. पुण्याच्या मुख्य पासपोर्ट कार्यालयातील अधिकार्यांना या केंद्रांमध्ये विभागण्यात आले आहे. परिणामी मुंढव्यातील पासपोर्ट सेवा केंद्रांतील अधिकार्यांची संख्या अपुरी पडते आहे.
तीन तासांपेक्षा जास्त वेळ
दिलेल्या अपॉइंटमेंटच्या तुलनेत पासपोर्ट कार्यालयात पंधरा छाननी अधिकारी आणि दहा अंतिम निर्णय घेणारे अधिकारी कार्यरत असणे अपेक्षित आहे. सध्या दोन्हीकडे प्रत्येकी चार अधिकारी काम करीत आहेत. गर्दीचा ताण येत असल्याने कामाला विलंब होतो आहे. एरवी अर्ध्या तासात होणार्या कामासाठी तीन तासांपेक्षा जास्त वेळ लागतो आहे. अधिकार्यांची संख्या वाढविण्यासंदर्भात पुणे पासपोर्ट कार्यालयाने परराष्ट्र मंत्रालयाशी वारंवार पत्र व्यवहार केला आहे. मात्र, परराष्ट्र मंत्रालयाने याची दखल घेतलेली नाही.