मुंबई : जर नारायण राणे साहेबांनी शिवसेना सोडली नसती, तर आजचे महाराष्ट्राचे राजकारण वेगळ्या दिशेेने गेले असते, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. मुंबईत आज माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या पासष्ठीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. याप्रसंगी केवळ काँग्रेसचेच नव्हे, तर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील दिग्गज नेतेही उपस्थित होते.
राणे शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये जात असताना मी त्यांना म्हटले होते की, तुम्ही आगीतून सुटून फुफाट्यात जात आहात. हे खरं आहे. कारण सुशीलकुमार शिंदेंना ठाऊक आहे की, हायकमांड हसली की आपल्यालाही हसावे लागते, असे मिश्कील भाष्यही गडकरी यांनी या वेळी केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह उपस्थित इतर नेत्यांनी राणेंच्या कार्यशैलीचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
बाळासाहेबांमुळे मी महाराष्ट्राला दिसतोय
– नारायण राणेंचे शिवसेनाप्रमुखांचे स्मरण
नारायण राणे महाराष्ट्राला दिसतोय तो केवळ बाळासाहेबांमुळे, असं सांगत राणेंनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींना राणे यांनी उजाळा दिला. माझ्या मनात मुंबईचा महापौर होण्याचा विचार होता, तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मला आमदारकीचे तिकीट दिले. म्हणूनच नारायण राणे महाराष्ट्राला दिसतोय तो केवळ बाळासाहेबांमुळे अन्यथा हा नोकरदार कोकणी माणूस महाराष्ट्राला कधी दिसला नसताच, अशी कृतज्ञता नारायण राणेंनी यावेळी व्यक्त केली.