पास दरवाढी विरोधात भीक मांगो आंदोलनाचा इशारा

0

पुणे। पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) वतीने देण्यात येणार्‍या विविध पासेच्या किमतीमध्ये येत्या 21 तारखेपासून वाढ करण्यात येणार असल्याची घोषणा पीएमपी प्रशासनातर्फे बुधवारी करण्यात आली आहे. ही दरवाढ मागे घेण्यात यावी अन्यथा या विरोधात भीक मांगो आंदोलन करण्याचा इशारा माजी उपमहापौर आबा बागुल यांनी दिला आहे. एकीकडे देशात, राज्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलासा देण्यासाठी धोरण राबविण्यात येत आहे. पुण्यात मात्र या धोरणाची पायमल्ली करून ज्येष्ठ नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रकार भाजप करत असल्याचा आरोप बागुल यांनी केला आहे. एकीकडे सार्वजनिक गणेशोत्सवाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करताना पासमध्ये सवलत देण्याऐवजी दर वाढविण्याचा प्रकार दुर्दैवी आहे. पास दरवाढ होऊ देणार नाही वेळ पडली तर रस्त्यावर उतरून भीक मांगो आंदोलन करू असा इशाराही दिला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री, पालकमंत्री यांच्याकडेही दाद मागण्यात येणार असल्याची त्यांनी निवेदनात म्हटले आहे.