पतियाळा: एकीकडे संपूर्ण देश करोनाशी लढा देत असताना, दुसरीकडे पंजाबमधील पतियाळात निहंग शीखांनी (परंपरागत हत्यारे बाळगणारे निळ्या कपड्यातील शीख) एका पोलिसावर हल्ला करत त्याचा हात पूर्णपणे कापला. हरजीत सिंग असे शीखांच्या हल्ल्यात हात कापण्यात आलेल्या सहायक पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. या हल्ल्यात पोलिस कर्मचार्याशिवाय बाजाराच्या बोर्डाचे अधिकारीही जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी ७ लोकांना ताब्यात घेतले आहे.
निहंग शीख एका कारमधून प्रवास करत होते. मात्र, रस्त्यावर बॅरिकेड्स लावलेले असतानाही निहंग शीखांना भाजी बाजारात जायचेच होते. पोलिसांनी त्यांच्याकडे कर्फ्यू पास दाखवण्यास सांगितले. मात्र, पास न दाखलता निहंग शिखांनी बॅरिकेड्सला ठोकर मारली आणि बॅरिकेड्स तोडून टाकले. त्यानंतर बाहेर येत त्यांनी ड्युटीवर असलेल्या पोलिस कर्मचार्यांवर सशस्त्र हल्ला केला, अशी माहिती पतियाळाचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक मनदीप सिंग सिद्धू यांनी माहिती देताना सांगितले.