पास वितरण उपकेंद्र सुरु करण्याची शिवसेनेची मागणी

0

वरणगाव । विद्यार्थ्यांना सहजगत्या पास सुविधा उपलब्ध होण्यासाठी 2 वर्षापुर्वी वरणगाव व कुर्‍हा पानाचे येथे पास सुविधा उपकेंद्र सुरु करण्यात आले होते. मात्र 20 सप्टेंबर पासून कोणतीही पुर्व सुचना न देता विभागीय नियंत्रकांच्या आदेशानुसार केंद्र बंद करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांची चांगलीच तारंबळ उडाली आहे. याबाबत शिवसेनेच्या वतीने आगार प्रमुखांना निवेदन देवून सदरचे केंद्र तात्काळ सुरू करावे अन्यथा विद्यार्थ्यांसोबत आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांना सहन करावा लागतो भूर्दंड
महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ प्रवाशी वाढविण्यासाठी वयोगटानुसार प्रवाशांसाठी विविध योजना कार्यन्वीत करण्यात आल्या. त्यात शिक्षण घेणार्‍या मुलांसाठी सवलतीच्या दरात पासेस उपलब्ध करुन दिल्या आहेत. शालेय स्तरापासून ते महाविद्यालयीन, विविध कोर्सेस, नोकरदारांचे पास सुविधा यामुळे भुसावळ बसस्टँडवरील पास सुविधा केंद्रावर मोठी गर्दी होत असे. यामुळे विद्यार्थ्यांचा आर्थिक भुर्दंडासह वेळेचा अपव्य होत असे. परिवहन मंडळाचे उत्पन्न वाढण्यासाठी परिवहन मंडळाचे महाव्यवस्थापकांनी शाळा, महाविद्यालयामध्ये जाऊन पासेस वितरीत करण्याचे आदेश दिले. यानुसार 2016 मधे वरणगाव येथील महात्मा गांधी विद्यालय व कुर्‍हा पानाचे येथील ग्रामपंचायतीच्या कार्यालयात पास सुविधा उपकेंद्र सुरू करण्यात आले होते.

उत्पन्न मिळूनही आगार प्रशासनाचे दुर्लक्ष
दोन्ही केंद्रातील जवळपास 1 हजार 60 विद्यार्थ्यांच्या माध्यमातून 4 ते 5 लाखाचे उत्पन्न आगाराला होत असे पास सवलतीच्या दरात असल्याने याकरीता 33.33 टक्के भाडे आकारणी होते तर 66.66 टक्के भाडे शासनाकडून मिळत असते. यामुळे आगाराचे उत्पन्न दहा ते अकरा लाखापर्यंत महिन्याला होत असे. मात्र सदरचे पास उपकेंद्र कोणतीही पुर्व सुचना न देता बंद केल्याने अनेक विद्यार्थ्यांना माघारी जावे लागले. याबाबत शिवसेनेचे प्रा. धिरज पाटील, देवेंद्र पाटील, सोनी ठाकुर, किशोर पाटील यांना माहिती मिळताच त्यांनी बस आगार गाठत पास उपकेंद्र सुरू करण्याची मागणी केली आहे. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. निवेदनाच्या प्रती परिवहन मंत्री, महाव्यवस्थापक, उपविभागीय व्यवस्थापक यांना पाठविण्यात आल्या आहेत.